Goa Election 2022: “शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना बहुतेक झेपली नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:16 PM2022-01-19T12:16:54+5:302022-01-19T12:18:09+5:30
Goa Election 2022: महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडी होत नसल्याचा फायदा भाजपला होणार नाही का, यावर संजय राऊत म्हणाले...
मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Goa Election 2022) सर्व पक्षांच्या हळूहळू उमेदवारी याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र, गोव्यातील काँग्रेसने तयारी दर्शवली नाही. त्यामुळे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाराज असून, त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची होत असलेली आघाडी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना झेपली नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊत मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांना महाविकास आघाडी होत नसल्याचा भाजपाचा फायदा होणार नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, मला असे वाटत नाही की, प्रत्येक वेळी भाजपाचाच फायदा होईल, असे का वाटावे? शिवसेनादेखील त्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस हेदेखील पक्ष आहेत. जो तो आपल्या ताकदीवर लढत असतो, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना बहुतेक झेपली नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल गोव्यात आहेत, माझी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मी गोव्याकडे निघालो आहे, दुपारी आम्ही एकत्र चर्चेसाठी बसतोय आणि पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करू की, कोण कुठे आणि किती जागा लढणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच गोव्यामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही पक्षांनी केला. आपण एकत्र काम करावे महाविकास आघाडी जशी महाराष्ट्रात आहे, त्याप्रमाणे गोव्यातही करावी. पण बहुतेक ही आघाडी गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांना झेपली नाही किंवा पेलली नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की, त्यांना आपण सत्तेवर येण्यासाठी शुभेच्छा देऊया आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी मिळून निवडणुका लढवूया. त्यानुसार आम्ही लढत आहोत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
आम्हाला माहिती आहे इथे आमची मर्यादा काय आहे
आम्हाला माहिती आहे इथे आमची मर्यादा काय आहे. आम्हाला माहिती आहे की, आम्हाला काय करायचे आहे. जर तृणमूल काँग्रेस ४० जागा लढवत असेल, तर ते मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आणू शकतात. परंतु ते जे चेहरे समोर आणत आहेत, ते तृणमूलपासून पळून जात आहेत. तसंच आम आदमी पार्टीमध्येही होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.