सरकार कोसळले पण, देवेंद्रांनी आपला शब्द खरा करुन दाखवलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 03:31 PM2019-11-28T15:31:18+5:302019-11-28T15:32:34+5:30
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर राज्यात सुद्धा भाजपचीचं सरकार येणार
मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या एका वाक्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टिंगल-टवाळी करण्यात आली. मी पुन्हा येईन, यावरुन राजकीय नेत्यांनीही फडणवीसांवर टीका केली. फडणवीसांच्या तो आत्मविश्वास नसून अहंकार असल्याचंही म्हटलं गेलं. त्यांना या एका भाषणावरुन, कवितेवरुन सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं. पण, एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा करुन दाखवलायं, अशी भावनाही एका वर्गाकडून व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर राज्यात सुद्धा भाजपचीचं सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास भाजपला होता. तर तसं वातावरण सुद्धा पाहायला मिळत होतं. त्यामुळं निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मेगाभरतीतून भाजपमध्ये सामील झाले होते. तर, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील आपल्या शेवटच्या भाषणातही मी पुन्हा येईन, असे म्हणत सत्ता भाजपा-शिवसेना युतीचीच होणार असून मीच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीसांच्या या भाषणाची, कवितेची मोठी टिंगल-टवाळी झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही मी पुन्हा येईन, या वाक्यावरुन देवेंद्रांना नागपुरात ट्रोल केले. तर, सोशल मीडियावर मिम्स आणि जोक्सही मोठ्या प्रमाणात वायरल झाले. टीकटॉकवरही व्हिडीओ पाहायला मिळाले. पण, राज्यातील राजकारणाची समिकरणं बदलली अन् फडणवीसांना पुन्हा न येऊ देण्यासाठी सर्वस्व पणाला लागले.
भाजपासोबत एकत्र लढूनही शिवसेना निवडणुकीनंतर भाजपासून वेगळी झाली. तर भाजपा-शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. पण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काका शरद पवारांना दे धक्का करत भाजपाला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं. अगदी, सकाळी-सकाळी शपथविधीही घेण्यात आला. त्यामुळे मी पुन्हा येईन, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्यान देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते आले अन् पुन्हा गेले, अशी चर्चा सुरू झाली. पण, देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला. फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ते पुन्हा आले, त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच कौतुकही झालं. तसेच, ते पुन्हा आले, असे म्हणत त्यांचं अभिनंदनही करण्यात आल.
मी पुन्हा येईन, या घोषणेवरुन देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले, पण त्यांनी आपला शब्द खरा करुन दाखवला. ते पुन्हा आले, पण 80 तासांसाठीच. कारण, त्यांच्या शपथविधीनंतर 80 तासांनी फडणवीस सरकार कोसळलं. पण, देवेंद्रांनी शब्द खरा केला, असेही भाजपाच्या समर्थकांकडून बोलले जात आहे.