भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास सरकारने भरपाई देणे आवश्यक - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 08:03 AM2019-01-06T08:03:26+5:302019-01-06T08:03:41+5:30

हायकोर्टाच्या निकालाने नवा पायंडा

Government should compensate you if death of dreaded dogs occurs - HC | भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास सरकारने भरपाई देणे आवश्यक - हायकोर्ट

भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास सरकारने भरपाई देणे आवश्यक - हायकोर्ट

Next

मुंबई : शहरांमधील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखणे हे स्थानिक प्रशासन व राज्य सरकार यांचे वैधानिक कर्तव्य आहे. त्या कर्तव्यात कसूर केल्याने भटके कुत्रे चाऊन एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल या दोघांनीही मृताच्या वारसांना भरपाई देणे बंधनकारक ठरते, असा नवा पायंडा पाडणारा निकाल मुंबईउच्च न्यायालयाने दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी भरदिवसा केलेल्या हल्ल्यात तेजस मारुती हाळे या पाच वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूबद्दल सांगली-मिरज-कुपवाड महापालिका व राज्य सरकार या दोघांना जबाबदार धरून न्या. अभय ओक व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. वडिलांसोबत घरी परतत असता २२ डिसेंबर २०१६ रोजी भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तेजसचा मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांनी २० लाख रुपये भरपाईसाठी याचिका केली. अंतरिम निकालात न्यायालयाने तेजसच्या मृत्यूला महापालिका व राज्य सरकार जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. तूर्तास अंतरिम भरपाई म्हणून दोघांनी मिळून तेजसच्या पालकांना ५० हजार रुपये द्यावेत, असा आदेश झाला. ही रक्कम तेजसच्या मृत्यूच्या दिवसापासून १८ टक्के व्याजासह द्यायची आहे. यापैकी २५ हजार रुपये हाळे दाम्पत्यास रोख मिळेल. बाकीची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवून त्याचे तिमाही व्याज त्यांना मिळेल. राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीपुढे भरपाईचा विषय विचाराधीन आहे. समितीने ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेऊन अहवाल द्यावा. तसा अहवाल दिल्यास त्याआधारे व अहवाल न दिल्यास त्याशिवाय अंतिम भरपाईचा निर्णय न्यायालय ८ फेब्रुवारी रोजी घेईल.

मोटार अपघाताशी तुलना
विशेष म्हणजे मोटार अपघातात दिल्या जाणाऱ्या भरपाईशी तुलना करून हा निकाल दिला गेला. त्याप्रमाणे या प्रकरणातही तूर्तास अंतरिम भरपाईचा आदेश दिला गेला.याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मनोज शिरसाट, महापालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर प्रभू व राज्य सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील पी. पी. मोरे काम पाहात आहेत.

Web Title: Government should compensate you if death of dreaded dogs occurs - HC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.