राज्यातील महायुतीही उद्या दाखवणार बळ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 06:58 AM2023-08-31T06:58:21+5:302023-08-31T06:59:27+5:30

लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी वरळीतील एनसीपीए सभागृहात ही बैठक होणार आहे.

Grand alliance in the state will also show strength tomorrow; BJP, Shiv Sena, NCP will review | राज्यातील महायुतीही उद्या दाखवणार बळ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घेणार आढावा

राज्यातील महायुतीही उद्या दाखवणार बळ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी घेणार आढावा

googlenewsNext

मुंबई : सत्तेच्या नवीन समीकरणाने राज्यातील तिन्ही सत्तारूढ पक्षांमध्ये खालच्या पातळीपर्यंत असलेले परस्पर अविश्वासाचे वातावरण, त्यातून आलेली अस्वस्थता या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांसह महायुतीतील अन्य पक्षांचे नेते, जिल्हाजिल्ह्यातील पदाधिकारी, आमदार, खासदार शुक्रवारी (दि. १) पहिल्यांदाच मुंबईत एकत्र येत आहेत. 

लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी वरळीतील एनसीपीए सभागृहात ही बैठक होणार आहे. यापुढे आपला एकत्रित बुलंद आवाज सगळीकडे दिसला पाहिजे असा संदेश या बैठकीतून ज्येष्ठ नेत्यांकडून तिन्ही पक्षांच्या कॅडरला दिला जाणार आहे. लोकसभेच्या ४२ हून अधिक जागा राज्यात जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील २०१९ मधील स्थिती, महायुतीला मतांचा टक्का कसा वाढविता येईल या बाबतचे सादरीकरणही बैठकीत होणार आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते खा.  प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत विभागवार बैठका होतील. समन्वयात येणाऱ्या अडचणी, एकत्रितपणे लोकसभेला सामोरे जाण्यासाठी उचलावयाची पावले याबाबत नेते मार्गदर्शन करतील. बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार हे पत्रपरिषद घेणार आहेत.  

छोट्या घटक पक्षांनाही निमंत्रण 
रामदास आठवले, महादेव जानकर, हितेंद्र ठाकूर, विनय कोरे, बच्चू कडू, सदाभाऊ खोत, ज्योती मेटे, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पक्षांनाही या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे तीन पक्षांच्या समन्वय समितीचे संयोजक आ. प्रसाद लाड यांनी सांगितले.

Web Title: Grand alliance in the state will also show strength tomorrow; BJP, Shiv Sena, NCP will review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.