आला रे आला... गणपती आला... मुंबईत 'गणराया'चे जल्लोषात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 05:18 PM2018-09-08T17:18:23+5:302018-09-08T17:21:56+5:30
मुंबापुरीतल बाप्पाच्या आगमनाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. येथील चिंचपोकळी येथील गणेश मंडळाने मोठी मिरवणूक काढली असून बाप्पांच्या मूर्तीसमोर ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकांच्या कसरती दाखवल्या आहेत.
मुंबई - गणेशोत्सवाचा सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेवला आहे. त्यामुळे सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. गणेशभक्तांकडून मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. गणरायासाठी मंडप सजविण्यात येत आहेत. तर ढोल ताशांचा गजरही लावण्यात येणार आहे. मुंबईतील काही गणेश मंडळांनी आज वाजत गाजत गणपती बाप्पांची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण, जहाँज पथकांचा आवाज आणि गणपत्ती बाप्पा मोरया... असा जयघोष पाहून गणेशभक्तांसह उपस्थितांचाही उत्साहण द्विगुणीत होत होता.
मुंबापुरीतल बाप्पाच्या आगमनाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. येथील चिंचपोकळी येथील गणेश मंडळाने मोठी मिरवणूक काढली असून बाप्पांच्या मूर्तीसमोर ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकांच्या कसरती दाखवल्या आहेत. तर, लेबर कॅम्पच्या बाप्पांचाही आगमन सोहळा नयनरम्य बनला आहे. अंधेरी पश्चिमच्या विश्वाचा महाराजा आधार गणेश मित्र मंडळानेही गणरायाचे जंगी मिरवणुकीने स्वागत केले आहे. तर लालबागमध्येही गणपतीच्या आगमनासाठी गणेशभक्तांचा महापूर आल्याचे दिसत आहे.
गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्री’चे आगमन होत आहे. मुंबईतील नामांकित गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळी चिंतामणीचा आगमन सोहळ्यास दणक्यात सुरूवात झाली आहे. या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पुण्याहून खास ढोल-ताशा आणि लेझीम पथक आले आहेत. गणरायाचे जोरात आगमन होत असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांच्या मूर्तीसमोर नाचण्यात दंग झाले आहेत. गुलालाची उधळण आणि आला रे आला गणपती आला, या जयघोषात लाडक्या बाप्पाला आपल्या मंडपात आणण्यात येत आहे. आज या गणेशमूर्तींना मंडपात ठेवण्यात येईल, त्यानंतर गणेश चतुर्थीदिवशी या मूर्तींची पारंपरिक पद्धतीने पूजा करुन दहा दिवसांसाठी मंडपात बाप्पाला विराजमान करण्यात येईल.