आजी-आजोबांपासून नातवाला दूर ठेवले जाऊ शकत नाही - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 02:47 AM2020-02-20T02:47:33+5:302020-02-20T02:47:51+5:30
आपण दुसरा विवाह केला आहे. पहिल्या पतीच्या पालकांनी चांगली वागणूक दिली नाही.
मुंबई : आजी-आजोबांपासून नातवाला दूर ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयानेमुंबईतील एका महिलेला आपल्या दहा वर्षांच्या मुलाला आठवड्यातून एकदा तिच्या सासू-सासऱ्यांना भेटू देण्यास सांगितले. कुटुंब न्यायालयानेही मुलाच्या आईला तिच्या दहा वर्षांच्या मुलाला सासू-सासऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. आठवड्यातूनएकदा किंवा ते दिल्लीवरून मुंबईत येतील तेव्हा त्यांना नातवाला भेटू द्यावे, असे आदेश कुटुंब न्यायालयाने संबंधित महिलेला दिले. या निर्देशाविरोधात तिने उच्च न्यायालयात अपिल केले. न्या. एस. जे. काथावाला व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती.
आपण दुसरा विवाह केला आहे. पहिल्या पतीच्या पालकांनी चांगली वागणूक दिली नाही. त्याशिवाय मुलाने जन्मापासून त्याच्या आजी-आजोबांना पाहिलेले नाही, असा युक्तिवाद महिलेतर्फे करण्यात आला.
न्यायालयाने टोचले कान
‘आपल्याला सासरच्यांनी नीट वागवले नाही, असे कारण सांगून नातवाला आजी-आजोबांपासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. जर नातू आजी-आजोबांना भेटला नाही तर त्याला अर्जदार जबाबदार असेल,’ असे न्यायालयाने म्हटले.
- कुुटुंब न्यायालयाचे आदेश असतानाही संबंधित महिलेने मुलाला भेटू दिले नाही. त्यामुळे आजी- आजोबांनी पुन्हा कुटुंब न्यायालयात धाव घेतली.