अजित पवारांनी रात्री 8 वाजता दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:13 PM2020-07-22T22:13:43+5:302020-07-22T22:15:36+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांचा आज वाढदिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळाही दिला. तर, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना राज्यातील दिग्गज नेत्यांकडून, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना महामारीच्या संकटामुळे सध्या ऑनलाईन शुभेच्छा देत त्यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यासोबत गप्पा मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा असं ठाकरेंनी या फोटोसह कॅप्शन दिलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार यांनी रात्री 8.00 वाजता ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवारांच्या या ट्विटला काही मिनिटांतच रिट्विट करत, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे खूप खूप आभार मानले. तसेच, आपल्यालाही वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा... असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2020
आपल्याही वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा @AjitPawarSpeaks दादा https://t.co/8FluwFP1WU
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेकांनी दोघांच्या शपथविधी सोहळ्याचा एकत्र फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे, सोशल मीडियावर या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस चांगलाच चर्चेचा आणि मजेशीर कमेंटचा पाहायला मिळाला. अजित पवार यांनी केलेल्या ट्विट्सवरही या दोन्ही राजकीय नेत्यांचे फोटो कमेंट करण्यात आले आहेत.