नियमानुसारच मृतदेह हाताळतो; महापालिकेचे प्रतिज्ञापत्र, उच्च न्यायालयात आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:51 AM2020-07-03T01:51:14+5:302020-07-03T07:09:28+5:30
सायन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह खाटेवर किंवा खाली ठेवण्यात आले होते आणि त्याच वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ शूट करण्यात आले होते
मुंबई : कोरोनाबाधित मृतदेहांची विल्हेवाट लावताना राज्य व केंद्र सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येते. महामारीमुळे परिस्थितीत नेहमी बदल होत आहे आणि या दररोज बदलणाऱ्या स्थितीतही महापालिका राज्य व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे, असे मुंबई महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे आणि हे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह कशा प्रकारे हाताळण्यात येतो आणि त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी राज्य सरकार व मुंबई महापालिकेला गेल्या आठवड्यात दिले होते.
सायन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह खाटेवर किंवा खाली ठेवण्यात आले होते आणि त्याच वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ शूट करण्यात आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामान्यांमध्ये संताप व्यक्त केला. याबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अॅड. राजेंद्र पै यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर देताना महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. महापालिकेने सर्व आरोप फेटाळून लावताना म्हटले की, महापालिका राज्य व केंद्र सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच मृतदेहांची विल्हेवाट लावते. सायन रुग्णालयात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली आहे आणि त्याचा अहवाल ९ मे रोजी सादर करण्यात आला. या अहवालानुसार, अनेक वेळा मृत व्यक्तीचे नातेवाईक रुग्णालयात उपस्थित नसतात त्यांना शोधावे लागते. तसेच लॉकडाऊन असल्याने मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना रुग्णालयात पोहोचणे शक्य नसते. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. त्यात काही कर्मचारी ऐनवेळी सुट्टी घेतात. तर काही कर्मचारी कोरोनाच्या भीतीने वॉर्डमध्ये येण्यास नकार देतात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मृतदेह वॉर्डमधून थेट संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांकडे देणे आवश्यक आहे.
‘सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी अनेक वेळा बैठका घेऊन राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
- महापालिकेने एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करण्यापासून त्याचा मृतदेह दफन करण्यापर्यंत स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोटोकॉल जारी केला आहे.
- एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर नातेवाइकांशी संपर्क करून माहिती देणे व कर्तव्यावर असलेल्या नर्सल पुढील प्रक्रिया पार पाडण्यास सांगणे.
- मृतदेह ठेवण्यासाठी वॉर्डमध्ये किंवा वॉर्डच्या जवळच जागा ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या मृतदेहाला वॉर्डबॉयने तात्काळ वॉर्डमधून हलवायला हवे.
- मृतदेहावर १ टक्के हायपोक्लोराईड लावण्यात येते व प्लास्टिक बॅगेत बांधण्यात येते. कर्मचाºयांना मृतदेह हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.