'जिथं मविआची सभा तिथं हनुमान चालिसा', राणांच्या विधानावर अजित पवारांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 07:25 PM2023-04-07T19:25:41+5:302023-04-07T19:26:22+5:30
महाविकास आघाडीने युती सरकारविरुद्ध वज्रमूठ आवळली असून मुंबईत 11 एप्रिलला मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई - छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेनंतर महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपुरात होणार आहे. 16 एप्रिलला ही सभा होणार आहे. नागपुरातील सुधार प्रण्यास मैदानात सभा घेण्याचं निश्चित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर महविकास आघाडी सध्या अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. आता, या सभांना लक्ष्य करत खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या सभा होतील, तिथ हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
महाविकास आघाडीने युती सरकारविरुद्ध वज्रमूठ आवळली असून मुंबईत 11 एप्रिलला मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच त्याच आठवड्यात 16 एप्रिलला नागपुरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरच्या सुधार प्रण्यास या मैदानावर ही सभा घेण्यात येणार आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या सभेवरुन नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण करुन ती जागा पवित्र करण्याचं आवाहन केलंय. त्यावर, आता अजित पवार यांनी, राणांचं स्वागत आहे, असे म्हटलंय.
चांगली गोष्ट आहे, मी त्यांचं स्वागत करतो. आमचा कोणाचाही हनुमान चालिसाला विरोध असायचं काहीही कारण नाही. त्यांना जर त्यामधून समाधान मिळत असेल तर आम्ही त्यांना समाधान मिळवून द्यायला तयार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, या महिन्यात राम नवमी झाली, हनुमान जयंती आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, महात्मा फुलेंची जयंती आहे, रमजानचा पवित्र महिना आहे, त्यामुळे, सर्वांना मी अभिवादन करतो, असेही त्यांनी म्हटले.
काय म्हणाल्या होत्या राणा
उद्धव ठाकरे जिथे जिथे सभा घेतील तिथे तिथे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचं पठन करून ती जागा स्वच्छ करावी, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी मला काही संदेश देण्याचा प्रयत्न केला, तिथे तिथे मी स्वतः जाऊन हनुमान चालिसा पठन करून ती जागा पवित्र करेन, असंही राणा यांनी बोलून दाखवलं. अमरावतीत हमुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं, त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.