कमावती व्यक्ती व्यसनाधीन असल्यास त्रास होणारच - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:41 AM2024-07-11T11:41:34+5:302024-07-11T11:41:47+5:30
दारू उत्पादनात महिलेची अटक ठरविली योग्य
मुंबई : कुटुंबातील कमावती व्यक्ती व्यसनाधीन असेल त्याला साहजिकच आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवित महिलेला बेकायदेशीरपणे दारूचे उत्पादन करत असल्यावरून केलेली अटक योग्य ठरविली. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सरस्वती राठोडला अटक करणे आवश्यक असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष योग्य आहे, असे मत न्या. भारती डांग्रे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
अटक केल्याप्रकरणी सरस्वती राठोड हिने १ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्ती नियमितपणे देशी दारूचे उत्पादन आणि विक्री करते. यामुळे लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला. तिने बनवलेल्या दारूचे व्यसन अनेकांना जडले आहे. कमावते सदस्य व्यसनाधीन असतात, त्यांना स्वाभाविकपणे समाजिक, आर्थिक आणि अन्य त्रासांना सामोरे जावे लागते. याचिकाकर्ती लोकांना दारू पुरवून व्यसनाधीन करते. त्यामुळे निश्चितच सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.