हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:03 AM2019-09-02T05:03:27+5:302019-09-02T05:03:50+5:30
संकल्प मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी रविवारी बैठक झाली. यावेळी पाटील ते म्हणाले,
इंदापूर (जि. पुणे): लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्माचे पालन करत, तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना ७१ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शब्द पाळताना दिसत नाही. त्यामुळे ४ सप्टेंबरला संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते आजमावून मी पुढची दिशा ठरवेन, असे सांगत काँग्रेस नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले.
संकल्प मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी रविवारी बैठक झाली. यावेळी पाटील ते म्हणाले, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इंदापूरच्या जागेबाबत शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी ही जागा सोडण्याबाबत स्पष्ट वक्तव्य केले नाही. यामुळे बुधवारी (दि. ४) सप्टेंबर रोजी इंदापूर येथे कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जो आग्रह राहील, त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर जागा सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेत नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेची सभा इंदापूर येथे घेतल्याने त्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून इंदापूर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत.