अतिवृष्टीनं मोठं नुकसान, ताबडतोब अधिवेशन बोलवा; अजित पवारांची आज पुन्हा मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:46 AM2022-08-05T11:46:53+5:302022-08-05T11:52:16+5:30
राज्य सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला. सरकार स्थापन होऊन ३६ दिवस झाले तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एका महिन्यात ६ हून अधिक वेळा दिल्ली वारी झाली. अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला नाही.
राज्य सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आज पुन्हा निशाणा साधला आहे. महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नाहीय. नेमकं ग्रीन सिग्नल का मिळत नाहीय?, सरकार कशाला घाबरत आहे, हेच कळत नाहीय, अशी टीका अजित पवारांनी केली.
राज्यकर्ते बदलत असतात. नवीन येत असतात जुने जात असतात. कोणीही सरकारमध्ये आलं तरी कायदा, संविधान नियम याच्या अधिन राहून काम केलं पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. अतिवृष्टीनं शेतीचं, घराचं, रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी असे अजित पवार म्हणाले. ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणीही अजित पवारांनी यावेळी केली.
दरम्यान, ३० जूनला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विधानसभेत सरकारने बहुमताचा ठराव जिंकला. परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्याने कॅबिनेट विस्तार रखडला आहे. त्याशिवाय शिंदे गट आणि भाजपा यांच्यात खातेवाटपावरून सहमती बनत नसल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोलले जात आहे. सरकार चांगले काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.