आयुष्य कसे जगावे हा तिचा प्रश्न : हायकाेर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:20 IST2024-12-14T08:20:33+5:302024-12-14T08:20:52+5:30
मुस्लीम मुलाबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याने पालक, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि काही समाजसेवकांनी १९ वर्षीय मुलीविरोधात पोलिसांत तक्रार केली.

आयुष्य कसे जगावे हा तिचा प्रश्न : हायकाेर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुस्लीम मुलाबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याने पालक, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि काही समाजसेवकांनी १९ वर्षीय मुलीविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तिला चेंबूर येथील वसतिगृहात ठेवले. मात्र, प्रेयसीचा ताबा मिळावा यासाठी मुस्लीम प्रियकराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शुक्रवारी त्यावरील सुनावणीत न्यायालयाने आपले आयुष्य कसे जगावे हा मुलीचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगत तिला तिचे भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य दिले.
न्या. भारती डांग्रे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने मुलीचा ताबा मुस्लीम मुलाला देण्यास नकार दिला असला तरी मुलीला तिच्या मर्जीनुसार वागता यावे, यासाठी योग्य ते आदेश देऊ, असे स्पष्ट केले.
मुलगी भावनिक झाली आहे आणि प्रभावाखाली येऊन अशी वागत आहे, असा युक्तिवाद मुलीच्या पालकांच्या वतीने वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही तिला पालकांकडे परतण्यास सांगितले. ती तयार नाही. जर तिला तिच्या कल्याणाची जाणीव असती तर काही हरकत नव्हती. आम्ही तिला आणखी एक वर्ष पालकांकडे राहण्यास सांगितले होते. जेणेकरून ‘तो’ मोह नाहीसा होईल,’ असे न्यायालयाने म्हटले.