राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील घाणीबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:23 AM2021-07-01T11:23:20+5:302021-07-01T11:24:25+5:30
समुद्रामध्ये फेकण्यात आलेला कचरा तौक्ते वादळामुळे पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर आल्याबाबतचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. सागरी किनारा स्वच्छतेची वाईट अवस्था समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर व पावसाळा सुरू होण्यापूर्वी समुद्रात टाकण्यात आलेला कचरा पुन्हा समुद्रकिनाऱ्यावरच आदळल्याने उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. समुद्रात कचरा टाकल्यामुळे केवळ समुद्रकिनारे अस्वच्छ होत नाहीत तर सागरी जीवनालाही याचा धोका आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
समुद्रामध्ये फेकण्यात आलेला कचरा तौक्ते वादळामुळे पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर आल्याबाबतचे वृत्त अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. सागरी किनारा स्वच्छतेची वाईट अवस्था समोर आली. याचा विपरित परिणाम सागरी जीवनावरही होत आहे, असे न्यायालयाने नमूद केले. ही समस्या राज्यातील सर्व सागरी किनाऱ्यांची आहे. त्यात मरिन ड्राईव्हचाही समावेश आहे. आम्ही याचीही स्वतःहून दखल घेऊन याचिका दाखल करून घेण्याच्या विचारात आहोत, असे न्यायालयाने म्हटले.
‘आम्हाला माहीत आहे की, राज्य सरकार कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. या कामांचा दबाव सरकारवर आहे. पण ही समस्याही गंभीर आहे’, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले. पण ही समस्याही काहीशी गंभीर आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा पुढे ढकलू शकत नाही, कारण सध्या पावसाळा सुरू आहे आणि हे घडत राहणार, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २ जुलै रोजी ठेवली.