रोईंगपटू दत्तू भोकनळला उच्च न्यायालयाचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 06:15 AM2019-08-01T06:15:35+5:302019-08-01T06:15:43+5:30
पत्नीचा जाच केल्यासंदर्भात नोंदविलेला गुन्हा केला रद्द
मुंबई : आॅलेम्पिक आणि रोर्इंगमध्ये आशियायी क्रीडा सुवर्णपदक पटकावलेला दत्तू भोकनळ याला उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर पत्नीचा छळ व फसवणूक केल्याचा गुन्हा न्यायालयाने रद्द केला.
पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून अर्जदारावर भारतीय दंड संहिता ४९८ (अ) व ४२० अंतर्गत केस नोंदविली जाऊ शकत नाही, असे म्हणत न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दत्तूला मोठा दिलासा दिला. मे महिन्यात नाशिक पोलिसांनी भोकनाळ याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ४९८ (ए) आणि ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविला. त्याच्या पत्नीने त्याच्यावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला. भोकनळ याची पत्नी नाशिक पोलीस दलात हवालदार आहे. उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द केल्याने दत्तूचा आॅस्ट्रियामध्ये ‘वर्ल्ड रोर्इंग चॅम्पियनशीप’ साठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.