दे धक्का... मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; आंदोलनाच्या घोषणेनंतर कोर्टाचे सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:11 PM2024-02-23T15:11:43+5:302024-02-23T15:12:56+5:30

जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरुन आता अनेकजण मनोज जरांगे यांच्याविरुद्ध भूमिका घेत आहेत.

High Court notice to Manoj Jarange; Court questions after declaration of agitation of maratha resevation | दे धक्का... मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; आंदोलनाच्या घोषणेनंतर कोर्टाचे सवाल

दे धक्का... मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; आंदोलनाच्या घोषणेनंतर कोर्टाचे सवाल

मुंबई - राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे. त्यात विरोधात बोलणाऱ्या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवारांवर मनोज जरांगे संतापले. मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा सकल मराठा समाजाला सांगितली आहे. त्यानुसार, ३ मार्च रोजी मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. आता, या आंदोलनावरुन कायदेशीर लढाई सुरू झाली असून उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. 

जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरुन आता अनेकजण मनोज जरांगे यांच्याविरुद्ध भूमिका घेत आहेत. अजय महाराज बारसकर यांनीही जरांगे हेकेखोर असल्याचं म्हटलं. तर, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेवर त्यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर विरोध करणारच असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये, न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, भूमिका स्पष्ट करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे. 

'मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत? आंदोलन हिसंक होणार नाही, याची जबाबदारी ते घेणार का? राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगेंना २६ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देशच हायकोर्टाने दिले आहेत.

जरांगेंच्या वकिलांनी मांडली बाजू

''जरांगेंवर जे आरोप होत आहे, ते त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे. जरांगेंचं आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे. राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही. एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत,'' असा आरोप जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी केला. आमचं आंदोलन हे शांततापूर्वकच असेल, अशी हमीही जरांगेंच्या वकिलांची उच्च न्यायालयात यावेळी दिली.

जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही का? तू कोण आम्हाला विचारणार, दरदिवस शांततेत आंदोलन करून सरकारला निवेदन देऊ शकतो. परीक्षा पुढे ढकला असं बोललो नाही. याला वेळेवर गोळ्या द्या. परीक्षा ठेवा. विद्यार्थ्यांना अडचण येता कामा नये, असं बोललो. मला नेता व्हायचं नाही तूच हो. ओबीसी समाजाला छगन भुजबळ सर्वात मोठा डाग लागलाय. मारुतीचे शेपूट तुझ्याकडेच येणार आहे, असं प्रत्युत्तर जरांगेंनी भुजबळांना दिले. 
 

Read in English

Web Title: High Court notice to Manoj Jarange; Court questions after declaration of agitation of maratha resevation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.