पोलिसांनी बेकायदा डांबलेल्या पिता-पुत्रास प्रत्येकी लाखाची भरपाई - हायकोर्टाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 03:07 AM2020-01-12T03:07:25+5:302020-01-12T03:07:39+5:30
पोलीस निरीक्षकाकडून केली जाणार वसुली; रक्कम ३० जानेवारीपर्यंत जमा करावी लागणार
मुंबई : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील किशोर लक्ष्मणराव फुटाणे (६३) आणि डॉ. इंद्रप्रसाद किशोर (३२) फुटाणे या पिता-पुत्रास सहा वर्षांपूर्वी पोलिसांनी बेकायदा कोठडीत डांबल्याबद्दल प्रत्येकी एक लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
न्या. झका अजीजूल हक आणि न्या. मुरलीधर गिराटकर यांच्या नागपूर येथील खंडपीठाने अलीकडेच दिलेल्या निकालानुसार देवळी पोलीस ठाण्याचे त्या वेळचे निरीक्षक धनंजय सायरे यांनी फुटाणे पिता-पुत्रात व्यक्तिश: ही भरपाई द्यायची असून ती रक्कम येत्या ३० जानेवारीपर्यंत न्यायालयात जमा करायची आहे.
निरीक्षक सायरे यांनी अधिकारांचा दुरुपयोग करून या दोघांना अरेरावीने कोठडीत डांबले, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला व त्यामुळेच त्यांना स्वत:च्या खिशातून भरपाई देण्यास सांगितले. देवळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस शिपाई वाल्मिक बुरिले हेही या बेकायदा कृत्यात सहभागी होते. परंतु आपण फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले, ही त्यांची सबब मान्य करून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध कोणताही आदेश दिला नाही. भरपाईखेरीज सायरे व बुरिले यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी करण्याची फुटाणे पिता-पुत्रांची विनंती खंडपीठाने मान्य केली नाही. मात्र या निकालाची आणि भरपाई द्यायला लावल्याची सायरे यांच्या ‘सर्व्हिस बुका’त नोंद करावी, असे निर्देश दिले गेले.
या निकालाने आपले समाधान झाले असल्याने भरपाई म्हणून मिळणारी रक्कम आपण देवळी येथील मिरान्नाथ महाराज देवस्थानास देणगी म्हणून देऊ, असे फुटाणे पिता-पुत्राने सांगितले. त्यानुसार भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी देवस्थानला डिमांड ड्राμटने देणगी देऊन तसा अहवाल कोर्टात सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले.
नेमके काय झाले होते?
किशोर फुटाणे देवळी येथील मिरान्नाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आहेत. सन २०१३-१४ मध्ये ते ट्रस्टचे चिटणीसही होते.
त्या वेळी पदाधिकाऱ्यांमधील वाद धर्मादाय आयुक्तांकडे सुरू होता. फुटाणे यांनी ट्रस्टचे रेकॉर्ड पाहण्यासाठी देण्याची मागणी केली. पण ते ट्रस्टचे त्या वेळचे अध्यक्ष पुंडलिक देवरावजी उघाडे यांच्याकडे असल्याचे सांगून ते रेकॉर्ड त्यांना दिले गेले नाही. १९ जानेवारी २०१४ रोजी किशोर यांनी देवस्थानचे कपाट उघडून रेकॉर्ड काढले व फुटाणे पिता-पुत्रांनी ते वाचले. यासंदर्भात २५ डिसेंबर २०१३ व १९ जानेवारी २०१४ अशा दोन वेळा पोलिसांत तक्रारी केल्या गेल्या. परंतु निरीक्षक सायरे यांनी चौकशी करून यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यासारखे
काही नाही, असा निष्कर्ष काढून प्रकरण बंद केले. मात्र १५ दिवसांनी ५ जानेवारी रोजी सायरे यांनी दंड प्रक्रिया संहितेच्या
कलम १५१(१) अन्वये (चॅप्टर केस) अधिकार वापरून फुटाणे पिता-पुत्रांस पहाटे पाच वाजता ताब्यात घेतले. त्याच दिवशी कार्यकारी
दंडाधिकाऱ्यांनी त्यांची ‘बॉण्ड’वर सुटका केली