उच्च न्यायालयाने आरोपीची फाशी केली रद्द; हत्येच्या आरोपातून सुटका, बलात्कार प्रकरणी ठरवले दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 05:55 PM2022-02-25T17:55:21+5:302022-02-25T17:58:44+5:30
एका मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी ठाण्यातील एक कामगार अशोक मुकणे याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बुधवारी त्याच्या शिक्षेत कपात केली.
मुंबई: आरोपीच्या अंगावर कोणतीही इजा नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीची फाशीची शिक्षा रद्द केली. आरोपीची हत्येच्या आरोपातून सुटका केली असली तरी न्यायालयाने त्याला बलात्काराप्रकरणी दोषी ठरवले आहे.
एका मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी ठाण्यातील एक कामगार अशोक मुकणे याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बुधवारी त्याच्या शिक्षेत कपात केली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, आसनगाव येथे राहणाऱ्या तरुणीवर मुकणे याने रेल्वे स्थानकाजवळील निर्जन रस्त्यावर बलात्कार केला. तिने मुकाणेला विरोध केल्याने त्याने तिच्या डोके आपटले व धारदार वस्तूने तिची हत्या केली.
न्यायालयाने उपलब्ध असलेली सामुग्री पडताळून म्हटले की, मुकणे याला कोणतीही इजा किंवा दुखापत झाली नाही. तसेच त्याचे कपडेही फाटले नव्हते, जे सहसा बलात्कारप्रकरणी घडते. मुकणे याने मुलीवर बलात्कार केला हे सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी डीएनए अहवालाचा आधार घेतला. तसेच अन्य काही महत्त्वाचे पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ‘पीडितेने विरोध केल्याच्या खुणा आरोपीच्या कपड्यांवर नाहीत. जर पीडिता शुद्धीवर असती तर आरोपीचे कपडे फाडलेले असते,’ असे न्यायालयाने म्हटले.
‘वैद्यकीय पुराव्यांवरून पीडितेवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र मुकणेनेच तिची हत्या केली आहे, हे दर्शविणारे ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत,’ असे म्हणत न्यायालयाने मुकणेची फाशीची शिक्षा रद्द केली व बलात्कार केल्याप्रकरणी दिलेली शिक्षा कायम केली.