राज्यातील 17 मंत्र्यांना घरचा जिल्हा तर 19 जिल्ह्यांना बाहेरचा पालकमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 09:49 AM2020-01-09T09:49:40+5:302020-01-09T09:53:08+5:30
ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर या ना त्या कारणावरुन राजी-नाराजीनाट्य समोर येत आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. ठाकरे सरकारमधील 36 मंत्र्यांचा हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे 43 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना पालकमंत्री पदापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामध्ये सर्वाधिक 4 राष्ट्रवादीचे मंत्री असून जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे.
ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर या ना त्या कारणावरुन राजी-नाराजीनाट्य समोर येत आहे. आता, पालकमंत्री पदावरुनही नाराजीनाट्य सुरू झालं आहे. राज्यातील 17 मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे, यात अमरावती, बीड, बुलढाणा. चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर उर्वरित 19 जिल्ह्यांना बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत. विशेष म्हणजे काह मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. पण, दुसऱ्या जिल्ह्याचं देण्यात आलंय. त्यामुळे या नेत्यांसह त्यांचे कार्यकर्तेही नाराज झाल्याचं दिसून येतंय. मंत्री घरचा अन् पालकमंत्री बाहेरचा अशी अवस्था या जिल्ह्यातील नागरिकांची झाली आहे. तर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आलंय.
कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना अहमदनगरची तर मुंबईचे सुभाष देसाई यांच्याकडे औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे
एकनाथ शिंदे (शिवसेना) हे दोन जिल्यांचे (ठाणे व गडचिरोली) पालकमंत्रिपद मिळवणारे या सरकारमधील एकमेव मंत्री ठरले आहेत
अहमदनगरमधील तनपुरे प्राजक्त, थोरात बाळासाहेब आणि गडाख शंकरराव हे तिघे मंत्री आहेत. पण त्यांच्या जिल्ह्यात बाहेरचा पालकमंत्री (हसन मुश्रीफ) देण्यात आला आहे
औरंगाबादमध्येही भुमरे संदीपानराव आणि अब्दुल सत्तार मंत्री असताना बाहेरचा पालकमंत्री (सुभाष देसाई) देण्यात आला आहे. सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्री करण्यात आले तर कॅबिनेट मंत्री भुमरे पालकमंत्र्यांच्या यादीत कुठेच नाहीत
कोल्हापूर जिल्ह्यात राजेंद्र पाटील, मुश्रीफ हसन आणि पाटील सतेज हे तिघे मंत्री असताना अहमदनगरचे बाळासाहेब थोरात यांना येथे पालकमंत्री करण्यात आले. मुश्रीफ यांना अहमदनगर तर सतेज पाटील पाटील यांना भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आली
मुंबई उपनगरात 4 मंत्री आहेत, पण मुंबई शहरातील आदित्य ठाकरे यांना येथील पालकमंत्री नेमण्यात आले. उपनगरातील सुभाष देसाई (औरंगाबाद), अस्लम शेख (मुंबई शहर), मलिक नवाब (परभणी), परब अनिल (रत्नागिरी), या सर्वाना इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री करण्यात आले आहे
नागपूरची जबाबदारी नितीन राऊत यांना मिळाली आहे. तर, या जिल्ह्यातील अन्य दोघे, मंत्री अनिल देशमुख आणि केदार सुनील यांना अनुक्रमे गोंदिया व वर्ध्याची जबाबदारी मिळाली आहे.
रत्नागिरीत उदय सामंत हे मंत्री असताना मुंबईतील अनिल परब यांना रत्नागिरीचे आणि सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री करण्यात आले आहे.