गृहनिर्माण प्रकल्पांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा : नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 09:12 AM2024-03-03T09:12:23+5:302024-03-03T09:14:27+5:30

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत असतात. जगाच्या अर्थव्यवस्थेचे आपल्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Housing projects should provide relief to common man says Narvekar | गृहनिर्माण प्रकल्पांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा : नार्वेकर

गृहनिर्माण प्रकल्पांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा : नार्वेकर

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू उभा राहिला आहे. पायाभूत सेवा- सुविधा प्रकल्प म्हणजे मैलाचा दगड आहे. कारण या प्रकल्पांमुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. गृहनिर्माण क्षेत्राला यामुळे दिलासा मिळतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला असे प्रकल्प आणि त्यातून गृहनिर्माण क्षेत्राला मिळणारा दिलासा बूस्ट देत असतात. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला पाहिजे, असा आशावाद विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी  ‘लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४’मध्ये व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत असतात. जगाच्या अर्थव्यवस्थेचे आपल्याकडे लक्ष लागून राहिले आहे. आजघडीला आपण जगातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहोत आणि हे सगळे अशा प्रकल्पांतूनच सिद्ध होणार आहे. कोणताही विषय असला, तर त्यात सामाजिक सुरक्षादेखील महत्त्वाची असते. आपण मुंबई मोठ्या प्रमाणावर विकसित करत आहोत. दक्षिण मुंबईतील अभ्युदयनगरच्या विकासाकडे लक्ष दिले गेले आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. वांद्रे येथे मोठे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. आपण केलेल्या कामाचे हे यश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘लोकमत’चे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण ‘लोकमत’कडून सातत्याने विविध विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. विविध विषयांना व्यासपीठ मिळाल्याने या क्षेत्रातील बहुतांशी गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असून, गृहनिर्माण क्षेत्र यापुढेदेखील देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच हातभार लावेल." यावेळी गृहनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रुणवाल ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष रुणवाल यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

एफएसआय का हवा? 
याचा विचार करा
अटल सेतूप्रमाणे सरकारने आता परवडणाऱ्या घरांवरदेखील जोर दिला पाहिजे. वाहतूक व्यवस्था हा एक पायाभूत सेवा- सुविधांचा भाग असून, आता चौथी मुंबई विकसित होत आहे. पुणे आणि मुंबई प्राधिकरण बनत आहे. चौथ्या मुंबईमुळे मुंबई आणि पुणे अधिकाधिक जवळ येत आहेत. जेवढ्या पायाभूत सेवा सुविधा बळकट होतील, तेवढा फायदा गृहनिर्माण क्षेत्राला होईल. एफएसआय का हवा? याचादेखील विचार करणे गरजेचे आहे. आपण इज ऑफ डुइंगचा विचार केला पाहिजे. ‘लोकमत’ या प्रक्रियेत प्रत्येकाच्या सोबत राहील.
- डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड

लोकमत रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात ज्या बांधकाम व्यावसायिकांना गौरविण्यात आले आहे; ज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, त्यानंतर त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. या पुरस्कारामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. गृहनिर्माण क्षेत्र हे जगाची कवाडे उघडणारे आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. धारावीसारखा परिसर आम्ही विकसित करत आहोत. याव्यतिरिक्त मुंबईत आणखी मोठे प्रकल्प उभे केले जात आहेत. एफएसआय दिला जात आहे. बिल्डर्स माेठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतात. अशांच्या कामाला लोकमतने प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. 
- मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री 
 

Web Title: Housing projects should provide relief to common man says Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.