एका राज्यापुरता पक्ष भाजपला पर्याय कसा काय ठरू शकतो? ममतांच्या वक्तव्यावर काँग्रेसमध्ये उमटली तीव्र प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 10:16 AM2021-12-02T10:16:29+5:302021-12-02T10:17:12+5:30
Congress News: वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही, तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सातत्याने लढत आहे. देशातील जनता हे पाहत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मुंबई : वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही, तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सातत्याने लढत आहे. देशातील जनता हे पाहत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून, भाजपने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपच्या या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस ठामपणे लढत आहे. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ते मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे. सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून, भाजपने लोकशाही व संविधानाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. समविचारी पक्षांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे.
- नाना पटोले,
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
काँग्रेसला कोणाच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही - अशोक चव्हाण
लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि केंद्रातील भाजप सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तिपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा, तसेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील सात वर्षे केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही.
भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पर्याय कसा ठरू शकतात - बाळासाहेब थोरात
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेसने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर या दरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. मात्र तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशा वेळी आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात, असा प्रश्न काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
शाहरूख खानला टार्गेट केले - ममता बॅनर्जी
मुंबई : दिग्दर्शक महेश भट्ट यांना लक्ष्य करण्यात आले. शाहरूख खानलाही लक्ष्य केले गेले. आपल्याला जर जिंकायचे असेल तर लढावे लागेल. जेथे शक्य आहे तेथे व्यक्त व्हावे लागेल. भाजप विरोधातील या लढाईत कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरी संस्था, कार्यकर्त्यांनी आम्हाला एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे मार्गदर्शन करावे, असे आवाहन बॅनर्जी यांनी केले.
बॅनर्जी यांनी बुधवारी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कलाकारांसह पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यात एक नाते आहे. सांस्कृतिक बंध आहेत. लाल-बाल-पाल या नावाने प्रसिद्ध असलेले लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या महान स्वातंत्र्यसैनिकांचे त्रिकूट असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली प्रसिद्ध कविता असो, सर्वांनाच याची माहिती आहे. यावरून आपल्या दोन्ही राज्यांचे किती घट्ट नाते आहे, हे दिसून येते, असे त्या म्हणाल्या.