तुमच्यासोबत कसा येऊ?, शरद पवारांचा सवाल; म्हणून दुसऱ्यांदा भेटले नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:13 AM2023-07-18T08:13:46+5:302023-07-18T08:14:00+5:30

शरद पवारांचा सवाल : अजित पवारांनी आमदारांसह घेतली भेट

How can we come with you?, Sharad Pawar's question; So the leaders met for the second time | तुमच्यासोबत कसा येऊ?, शरद पवारांचा सवाल; म्हणून दुसऱ्यांदा भेटले नेते

तुमच्यासोबत कसा येऊ?, शरद पवारांचा सवाल; म्हणून दुसऱ्यांदा भेटले नेते

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
मुंबई : अजित पवार गटाने सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आयुष्यभर ज्यांच्याविरोधात लढलो, आता त्यांच्यासोबत कसे जाऊ? असे शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. अजित पवारांनी समर्थक आमदारांसह सोमवारी भेट घेतल्यानंतर पवार यांनी हे विधान केले आहे.     

अजित पवारांच्या दालनात त्यांच्या गटाचे मंत्री आणि आमदारांची बैठक पार  पडली. या बैठकीत पुन्हा शरद पवारांना भेटायचे ठरले. त्यानुसार हे सर्वजण यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले. मात्र तोपर्यंत शरद पवार तिथे आले नव्हते. शरद पवार आल्यावर जयंत पाटील यांना बोलावून घेण्यात आले. काही आमदारांनी पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि पुन्हा एकदा आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. मात्र शरद पवार त्यांच्यासमोर काहीच बोलले नाहीत.

‘हे सगळे इथे कशासाठी?’
शरद पवार पोहोचले तेव्हा तिथे बऱ्याच गाड्या, माध्यमांचे कॅमेरा त्यांच्या नजरेस पडले. हे सगळे इथे कशाला आले आहेत, असे पवारांनी जितेंद्र आव्हाडांना विचारले. तेव्हा आव्हाडांनी त्यांना अजित पवार गटाचे नेते भेटीसाठी आल्याचे सांगितले.

तोपर्यंत बघितली वाट 
शरद पवारांनी जयंत पाटील यांना फोन केला. पाटील तेव्हा घरी होते. मला पोहोचायला वेळ होईल तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, असे पाटील यांनी पवारांना सांगितले. मात्र तुम्ही येईपर्यंत मी त्यांना भेटत नाही, असे पवारांनी सांगितल्यावर पाटील यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. त्यानंतर ही बैठक सुरू झाली. 

तुम्ही भेटलात आमचे काय? 
रविवारी नेते व मंत्री शरद पवारांना भेटल्यानंतर गटातील आमदारांनी विधानभवनातील बैठकीत संताप व्यक्त केला. तुम्ही शरद पवारांशी जुळवून घेतले, आम्ही लोकांना काय सांगणार? असा सवाल विचारला. त्यामुळे सोमवारी पुन्हा आमदारांना घेऊन पवारांच्या भेटीला जाण्याचे ठरले.

कोण कोण भेटले?
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदार अतुल बेनके, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्ता भरणे, संजय शिंदे, अण्णा बनसोडे, इंद्रनील नाईक, राजू कोरमोरे, संजय बनसोडे, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, विक्रम काळे यांनी शरद पवारांची भेट घेतली.  

आज अधिवेशन सुरू झाल्याने आमदार मुंबईत उपस्थित होते. म्हणून आमदारांसह आशीर्वादासाठी आम्ही इथे आलो. पक्ष एकसंघ राहावा, त्या दिशेने शरद पवारांनी विचार करावा, अशी विनंती केली. त्यांच्या मनात काय आहे हे मी कसे सांगू?   
    - प्रफुल्ल पटेल, 
    नेते, अजित पवार गट 

आजही त्यांनी पवारांना कालसारखी विनंती केली. पण यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे हे जरूरी नाही.  
    - जयंत पाटील,     प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी 

Web Title: How can we come with you?, Sharad Pawar's question; So the leaders met for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.