विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार?; पक्षाच्या सर्व्हेतून समोर आली आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 12:03 PM2024-07-21T12:03:23+5:302024-07-21T12:03:56+5:30

काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी आली असून पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक सर्व्हे केल्याची माहिती आहे.

How many seats will Congress get in the assembly elections The statistics emerged from the partys survey  | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार?; पक्षाच्या सर्व्हेतून समोर आली आकडेवारी 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार?; पक्षाच्या सर्व्हेतून समोर आली आकडेवारी 

Maharashtra Congress ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून आज पुण्यात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. अशातच आता काँग्रेसच्या गोटातूनही एक महत्त्वपूर्ण बातमी आली असून पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यात ७५ जागांवर विजयाची चिन्हे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांचा सर्व्हे केला असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला ७५ जागांवर यश मिळू शकतं, असा अंदाज या सर्व्हेतून समोर आल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पक्षाकडून मुख्यमंत्रि‍पदावरही दावा केला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही काँग्रेसने सुरू केल्याची माहिती आहे. याबाबत 'साम टीव्ही'ने वृत्त दिलं आहे.

काँग्रेसकडून १५ नेत्यांची फौज मैदानात

काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ अशा १५ नेते व प्रवक्ते मंडळी यांना भाजपाशी दोन हात करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. ही सर्व मंडळी पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमांशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत. भाजपाच्या आय टी सेल कडून सातत्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळींबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत असून फेक न्यूज आणि फेक नरेटिव्ह तयार केले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

कोणकोणत्या नेत्यांचा समावेश?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरण सिंग सप्रा या १५ जणांचा या टीममध्ये समावेश आहे.
 

Web Title: How many seats will Congress get in the assembly elections The statistics emerged from the partys survey 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.