भाजपकडे इतका पैसा आलाच कसा? - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:39 AM2019-06-06T02:39:08+5:302019-06-06T02:39:22+5:30

सेंटर फॉर मीडिया स्टडिजच्या अहवालानंतर काँग्रेसचा सवाल

How much money has come to the BJP? - Congress | भाजपकडे इतका पैसा आलाच कसा? - काँग्रेस

भाजपकडे इतका पैसा आलाच कसा? - काँग्रेस

Next

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६० हजार कोटींचा खर्च करण्यात आला. त्यातील २७ हजार कोटी एकट्या भाजपने खर्च केल्याचा अहवाल सेंटर फॉर मीडिया स्टडीज्ने जाहीर केला. भाजपकडे इतका पैसा आलाच कसा? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

भाजपने निवडणुकीवर केलेल्या खर्चावर चिंता व्यक्त करीत सचिन सावंत म्हणाले, दिवसेंदिवस खर्चीक होत जाणाऱ्या निवडणुका लोकशाहीसाठी घातक आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला असेल तर त्याचे मूळ भ्रष्टाचारच असू शकते. हा खर्च म्हणजे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेला आव्हानच आहे. भाजपने एक प्रकारे निवडणूक आयोगासमोर लोकशाहीचे वस्त्रहरण केले असून आयोग मात्र धृतराष्ट्र बनून राहिला आहे, अशी टीकाही सावंत यांनी केली.

सेंटर फॉर मीडिया स्टडीज्ने लोकसभा निवडणुकीत झालेल्या खर्चाचा अहवाल जाहीर केला आहे. या निवडणुकीत तब्बल ६० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे. यातील ४५ टक्के म्हणजेच तब्बल २७ हजार कोटी एकट्या भाजपने खर्च केले आहेत, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. निवडणुकीच्या एकंदर प्रक्रियेला भाजपने भांडवलशाही, व्यापार पद्धतीने एकाधिकारशाहीकडे नेले आहे. इतर कोणत्याही पक्षाकडे भाजपएवढी खर्च करण्याची क्षमता नसून प्रचंड पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा नवा पायंडा भाजपने पाडला आहे, त्यामुळे लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असेही सावंत म्हणाले.

Web Title: How much money has come to the BJP? - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.