राज्यपालांच्या बोलण्यावर निर्बंधाचे आदेश कसे देणार? हायकोर्टाचाच सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 07:09 AM2022-12-02T07:09:13+5:302022-12-02T07:09:38+5:30
उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेल्या टिप्पणीविरोधात केलेली याचिका ‘जनहित याचिका’ कशी होऊ शकते, अशी विचारणा करीत राज्यपालांच्या बोलण्यावर निर्बंध घालणारे आदेश न्यायालय कसे देऊ शकते? असा प्रश्न मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला केला.
शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका दीपक मावळा यांनी ॲड. नितीन सातपुते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. देशाची अखंडता, सुरक्षा धोक्यात आणल्याचा किंवा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाल्यास कोश्यारी यांच्यावर महाभियोग चालविला जाऊ शकतो. तसेच कोश्यारी यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मानसिक सुदृढता प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.