वेगळा निकाल लागेल असं वाटत नाही, पण समजा लागलाच तरी...; अजित पवारांचं ठरलंय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 01:54 PM2023-05-15T13:54:34+5:302023-05-15T14:20:01+5:30
मध्यावधी निवडणुकांची चर्चा माझ्याही कानावर आली आहे
मुंबई - कर्नाटकच्या निकालामुळे महविकास आघाडीचा उत्साह वाढला असून मुंबईत त्याच अनुषंगाने बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकीत रणनिती आणि तिन्ही पक्षांसाठीच्या जागावाटपाची चर्चाही या बैठकी झाल्याची माहिती आहे. त्याच, अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थीर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची शक्यता अजित पवार यांनी फेटाळत सत्तेसाठीचं गणितच मांडलंय. त्यामुळे, सरकार पडणार नसल्याचं अजित पवारांच्या मनात ठरलंय, असंच दिसून येतं.
अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती. याच दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीही अजित पवारांनी शिंदे सरकार स्थिर असल्याचं म्हटलं होतं. भविष्यात १६ आमदार जरी अपात्र ठरले तरीदेखील सरकार स्थिर राहिल, असं म्हणत त्यांनी थेट आकडेवारीचं गणितच माडंलं. आता, पुन्हा एकदा अजित पवार यांनी सरकार पडण्याची शक्यता नाकारली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
मध्यावधी निवडणुकांची चर्चा माझ्याही कानावर आली आहे. मात्र, १६ आमदारांबाबत सध्या वेगळा काही निर्णय होईल असं वाटत नाही. जरी वेगळा निर्णय झाला, हे १६ आमदार अपात्र ठरले तरी उर्वरीत २७२ आमदारांकडून बहुमताचा आकडा सध्याच्या सरकारकडे आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष मिळून १६५ चं संख्याबळ सरकारकडे आहे. १६ आमदार जरी अपात्र ठरले तरी सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहणार आहे, असं गणित अजित पवार यांनी मांडलं.
दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी महाविकास आघाडी, राज्यातील सरकार, विधानसभा अध्यक्षांचा अधिकार यांसह राज्यातींल विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.