मी कधीच कंबरेखाली वार करत नाही, पण...; जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 05:26 PM2023-01-05T17:26:44+5:302023-01-05T17:27:12+5:30
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे आणि औरंगजेबाबद्दलच्या विधानामुळे चर्चेत आहेत
मुंबई - राज्यात सध्या महापुरुषांबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन वाद रंगला असतानाच, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा क्रूर नव्हता असं म्हटल्याने नवा वाद सुरू झाला. त्यावरुन, दोन्ही नेत्यांच्या विरुद्ध भाजप नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यातच, अजित पवार यांनी आमदार नितेश राणेंवर टिल्ल्या म्हणत अप्रत्यक्षपणे टिका केली आहे. हा वाद सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्ले करू नका, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे आणि औरंगजेबाबद्दलच्या विधानामुळे चर्चेत आहेत. त्यातच, हे वाद आता वैयक्तिक पातळीवर चालल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट करत आवाहनच केलं आहे. ''मी कधीच कुणावर वैयक्तिक कंबरेखाली वार करत नाही. कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही, पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल. तेव्हा एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करू नका, असे ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांनी हे नेमकं कोणाबद्दल आणि कोणत्या मुद्द्यावरुन केलंय, हे सांगता येत नाही. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन त्यांचं हे ट्विट असावं, असा अंदाज बांधता येईल.
मी कधीच कुणावर वैयक्तिक कंबरे खाली वार करत नाही कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2023
तेव्हा एकमेकान वर वैयक्तिक हल्ला करू नका
ऋता आव्हाड यांचा गंभीर आरोप
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रिदा राशीद यांनी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर 354 कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्यानंतर 376 अर्थात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिला तयार करण्याचा घाट घातला जातोय, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केलं आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून याबद्दल ऋता आव्हाड यांनी विचारणाही केली आहे.
आव्हाड यांनी व्हिडिओ केला होता ट्विट
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत एक महिला कारमध्ये बसलेली दिसत आहे. या ट्विटमध्ये आव्हाड लिहितात की, ३५४ चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ३७६ ची तयारी सुरु केली आहे. ३५४ मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ... त्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरू आहे.',