'मला वाटतंय नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय', भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:39 PM2022-10-04T12:39:39+5:302022-10-04T12:59:54+5:30
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे.
मुंबई - देशात गेल्या काही दिवसांपासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जाणवत असून जनावरांचं लसीकरण केलं जात आहे. सध्या राज्यात अनेकविध मुद्द्यांवरुन राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, देशभरात लम्पी आजाराने धुमाकूळ घातल्याने मोदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अजब दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातून आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. नानांच्या या टिकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले, असा आरोप नाना पटोले यांनी केला. महागाई, बेरोजगारी हे देशासमोरील सध्याचे सर्वात मोठे संकट आहे पण मोदी सरकारच्या काळात नोकऱ्यांची निर्मिती करण्याऐवजी आहे त्या नोकऱ्या संपवण्याचे काम केले गेले, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. आता, नानांच्या या विधानावर भाजपने सडेतोड प्रतिक्रिया देताना नाना पटोलेंना लम्पी आजार झालाय, असं वाटत असल्याचं म्हटलं.
नाना पटोले मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्यातून मला असं वाटतंय की लम्पी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा. त्यामुळे त्यांनाच डॉक्टरांकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याची गरज आहे, असा पलटवार चंद्रेशखर बावनकुळे यांनी केला. नाना पटोले हे मीडियाची स्पेस मिळविण्याकरीता, राहुल गांधीच्या जवळ जाण्याकरता व तसेच आपले अध्यक्षपद टिकविण्याकरता असे वक्तव्य नेहमीच करत राहतात, असेही त्यांनी म्हटले.