Palghar Mob Lynching: 'मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'; सरपंचांनी सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 08:58 AM2020-04-24T08:58:32+5:302020-04-24T09:43:41+5:30
गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपाचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपाचा सरंपच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत, असा दावा काँग्रेसने केला होता.
मुंबई: पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशात राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच या सर्व प्रकरणानंतर राज्य सरकारवरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपाचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपाचा सरंपच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपानंतर मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण माझं ऐकलं नाही अशी प्रतिक्रिया सरपंच चित्रा चौधरी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
चित्रा चौधरी म्हणाल्या की, मला त्या तीघांची गाडी अडवलेली आहे, लवकर या असं सांगण्यात आले. मी जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा त्या ठिकाणी ५०० ते ६०० जण गोळा झाले होते. मी त्यांना विचारलं की गाडी कुठून आली आहे. मात्र त्यांनी काही सांगितलचं नाही. गाडीचे दरवाजे देखील लॉक करण्यात आले होते. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या जमावाकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली. मी जवळपास तीन तास जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण माझं ऐकलं नाही असं चित्रा चौधरी यांनी सांगितलं. तसेच मी थांबण्याचा प्रयत्न करताना काही लोकांनी मलाही मारायची धमकी दिली असल्याचा आरोप चित्रा चौधरी यांनी केला आहे.
पालघरच्या या दुर्देवी घटनेवरून भाजपा धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे याची भाजपाला लाज वाटली पाहिजे. गेल्या ५ वर्षात सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षंभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी दिली होती. तसेच गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपाचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपाचा सरंपच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. लिंचिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपाचे लोक आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला होता.
पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.
हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आणखी वाचा...
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
नोकरी वाचेल पण... केंद्र सरकार कठोर उपाय योजणार; कर्मचाऱ्यांना फायदा की तोटा?