मी गटातटाचे राजकारण करणार नाही, पण तुम्ही गटतट सोडणार का? बाळासाहेब थोरातांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 06:59 PM2019-07-18T18:59:04+5:302019-07-18T19:08:02+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये गटातटाचे राजकारण ही काँग्रेसची ओळख बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरार यांनी गटातटाचे राजकारण न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
मुंबई - गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष अनेक गटातटांमध्ये विभागून पूर्णपणे पोखरून गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरार यांनी गटातटाचे राजकारण न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. बाळासाहेब थोरात यांचा पदग्रहण सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाच नूतन कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नितीन राऊत, मुझफ्फर हुसैन, विश्वजित पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी हे आवाहन केले.
प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना थोरात म्हणाले की, रामराव आदिक, प्रतापराव भोसले हे सत्ता नसताना प्रदेशाध्यक्षपदी होते. त्यांच्या काळातच काँग्रेसची सत्ता परत आली. माझ्या घरीच काँग्रेसची परंपरा आहे. शाळकरी होतो तेव्हा काँग्रेसची घोषणा दिल्या होत्या. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून आज प्रदेशाध्यक्ष होण्याचे भाग्य मला मिळाले आहे. मी कुठलाही गटतट मानणार नाही.सर्वांना समान ठेवणार. पण तुम्ही गटतट सोडणार का? वेळ संकटाची, अडचणीची आहे. सगळे मनातले भेद वाद काढून टाका, मन निर्मळ करा,''
या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांनीही कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेसचे प्रभागी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ''मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चांगले काम केले. अलीकडेच ज्या निवडणुका झाल्या त्या अपेक्षित यश मिळाले नाही. पण हे काही फक्त महाराष्ट्रात घडले असे नाही. देशभरातच काँग्रेसला अपेक्षित यश नाही मिळाले. त्यामुळे राज्यातील निकालांचे वाईट वाटून घेऊ नये. काँग्रेसमध्ये व्यक्तीला नाही तर विचाराला महत्व आहे.
बाळासाहेबांकडे जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्रित काम करायला हवे. पदासाठी नाही तर विचारांच्या अंमलबजावणीसाठी एकत्रितपणे काम करायला हवे. व्यासपीठावरील नेत्यांनी किमान चार विधानसभा जागांसाठी तन, मन, धनाने काम केले तर राज्यात नक्कीच विजय मिळेल. एआयसीसीचे पदाधिकारी, सरचिटणीस, माजी मुख्यमंत्री आदींनी ही जबाबदारी उचलली तरी विजय लांब नाही.'' तसेच आगामी निवडणुका आघाडी म्हणूनच लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.