"अजित पवार माझ्या पक्षात आले तर आनंदच, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:29 PM2023-04-13T18:29:37+5:302023-04-13T18:55:33+5:30
अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे मातोश्रीत येऊन रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केला
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पहाटेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे, त्यांच्या राजकीय पक्षबदलाच्या विश्वासर्हतेवर अनेकदा प्रश्न निर्माण होतात. त्यातूनच, राज्यात काहीतरी राजकीय घडामोड घडणार असेल तर अजित पवार यांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कालच अंजली दमानिया यांनी अजित पवार हे काही आमदारासमवेत भाजपसोबत जाणार असल्याचं ट्विट केलं. दमानिया यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यावरुनच, आता रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनीही अजित पवारांना ऑफर दिली आहे.
अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे मातोश्रीत येऊन रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केला. त्यावरून शिंदे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. त्यात युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही त्यांच्या अनोख्या शैलीत ठाकरेंचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले अशी चारोळी आठवलेंनी म्हणत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दलही आपलं मत व्यक्त केलं.
राज्यात अजित पवारांबद्दल ज्याकाही चर्चा सुरू आहेत. त्यावरून रामदास आठवलेंना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, अजित पवार भाजपात जातील असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात काही होऊ शकते. अजित पवार आमच्या पक्षात येत असतील तर आनंदच आहे, ते एक्टीव्ह नेते आहेत, सक्षम नेते आहेत, पवारसाहेबांच्या जवळचे आहेत. त्यात जर आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर ती संधी आम्ही अजित पवारांना देऊ, असे रामदास आठवलेंनी म्हटले. अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ अशी ऑफरच एकप्रकारे रामदास आठवले यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे रडणार माणूस नाही
रामदास आठवले म्हणाले की, आदित्य ठाकरे, म्हणतात, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणे अत्यंत चुकीचा आहे. एकतर भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले असं त्यांनी सांगितले.