१० दिवसांत वीज दरामंध्ये कपात न केल्यास उग्र आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 09:19 PM2018-12-01T21:19:02+5:302018-12-01T21:19:34+5:30
गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर या कंपनीने विजेच्या दरांमध्ये जी भरमसाठ दरवाढ केलेली आहे, त्यामध्ये येणाऱ्या १० दिवसांत कपात करावी अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल
मुंबई - गौतम अदानी यांच्या अदानी पॉवर या कंपनीने विजेच्या दरांमध्ये जी भरमसाठ दरवाढ केलेली आहे, त्यामध्ये येणाऱ्या १० दिवसांत कपात करावी अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अदानी पॉवरचे मालक गौतम अदानींना दिला व तात्काळ कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली.
याबद्दल संजय निरुपम म्हणाले की, काल मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील १५ रेल्वेस्थानकांवर वीजबिलांमध्ये होणाऱ्या भरमसाठ दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याबद्दल उत्तर देण्यासाठी आज गौतम अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कडून एक स्टेटमेंट देण्यात आली होती की, विजेचे दर आम्ही वाढवले नसून डिसेंबर २०१७ मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स एनर्जीनेच एमईआरसी (MERC) कडे नवे वाढीव दर लागू करण्याची मागणी केली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून सप्टेंबर २०१८ पासून विजेचे दर वाढवण्यात आलेले आहेत. याबद्दल मी गौतम अदानींना सांगू इच्छितो की, की त्यांनी रिलायन्स एनर्जीने एमईआरसी केलेल्या मागणीचे कारण पुढे करून त्यांनी आपले हात झटकणे बंद करावे. वाढलेले वीजबिल कमी करून मुंबईकरांना दिलासा देण्याऐवजी कारणे देऊन वेळ मारून नेण्याचे काम गौतम अदानी कसे काय करू शकतात?
वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य मुंबईकर पुरता हवालदिल झालेला आहे. चुकीच्या पद्धतीने बिले बनवून, एनर्जी चार्ज, व्हिलिंग चार्ज, रेग्युलेटरी ऍसेट चार्ज मध्ये वाढ करून भरमसाठ वीजबिले मुंबईकरांच्या माथी मारली जात आहेत, त्यामुळे तो पुरता कोलमडून गेलेला आहे. या वेगवेगळ्या चार्जेस मध्ये भरमसाठ दरवाढ करून मुंबईकरांची ज्या पद्धतीने लूट केली जात आहे, ते अदानी ग्रुपने ताबडतोब थांबवावे. तसेच मीटर रिडींग साठी जे मीटर्स वापरले जातात, तेही दोषपूर्ण आहेत. अशी सदोष मीटर रिडींग त्यांनी बंद करावी. जर गौतम अदानींनी येणाऱ्या १० दिवसांत वीजदरांमध्ये कपात केली नाही, तर त्यांना उग्र आंदोलनास व मुंबईकर जनतेच्या मनांत खदखदणाऱ्या प्रक्षोभास सामोरे जावे लागेल आणि यासाठी सर्वस्वी जबाबदार गौतम अदानी स्वतः असतील, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.