शिवसेनेने साद दिली तर भाजपाचे दार आजही खुले; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 07:30 AM2019-12-14T07:30:56+5:302019-12-14T07:31:31+5:30
आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
मुंबई - गेल्या महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षातून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता आणली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. मात्र खातेवाटपाला झालेला उशीर पाहता महाविकास आघाडीत सगळंकाही आलबेल आहे असं चित्र नाही याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा हाक दिली आहे.
एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही. मात्र शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा असं त्यांनी सांगितले.
तसेच अजित पवारांनासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं हा आमचा गनिमी कावा होता. तो फसला असेल मात्र त्याचे नायक अजित पवार आणि सहनायक मी आहे. अजित पवारांच्या साथीने राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत काही मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होती. अजित पवारांनी आम्हाला सांगितले होते की, शरद पवारांना ही गोष्ट माहित आहे. पण पवारांनी मान्यता आहे की नाही याबाबत आम्ही विचारणा केली नाही. अजित पवारांसोबत काही आमदारही होते.
त्याचसोबत आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी उलगडून सांगितल्या. लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं.