'चुकले तर सांगा की, चूक दुरुस्त करून पुढे जाऊ...'; अजित पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:20 AM2023-07-06T07:20:48+5:302023-07-06T07:21:02+5:30
मी खोटे बोलत नाही. खोटे बोललो तर पवाराची औलाद सांगणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
मुंबई : माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या म्हटले तर प्रमुखपद लागते. त्यासाठी मला राज्याचा प्रमुख व्हावे, असे मनापासून वाटते. अनेकदा मी माघार घेतली. मी टीका सहन केली. अनेकदा मी अपमान सहन केला. अनेकदा मला व्हिलन ठरवण्यात आले; पण आता हे सहन करणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
२०१४ मध्ये प्रफुल्लभाईंचे शरद पवारांशी बोलणे झाले. नंतर प्रफुल्लभाईंनी जाहीर केले की, आम्ही बाहेरून भाजपाला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो. का? तर नेत्यांचा निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितले की, सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा. तेव्हा त्यांच्याबरोबर जायचे नव्हते, तर आम्हाला तिथे का पाठवले? मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले? २०१७ रोजी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मी, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि अजून एक, असे चार जण होतो. समोर सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघे होते. कुठली खाती, कुठले पालकमंत्रिपदे हे सगळे ठरले होते. मी खोटे बोलत नाही. खोटे बोललो तर पवाराची औलाद सांगणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
आम्हाला निरोप आला. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवले. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले २५ वर्षांचा आमचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. ते म्हणाले शिवसेनाही आघाडीत राहील. आपल्या वरिष्ठांना ते मान्य नव्हते. ते म्हणाले, ‘शिवसेना आम्हाला चालणार नाही. शिवसेना जातीतवादी आहे.’२०१९ रोजी निकाल लागले, मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, प्रफुल्ल पटेल, ते उद्योगपती, भाजपाचे वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्र यांना आपल्या नेत्यांनी सांगितले, की कुठे बोलायचे नाही. मग मी का बोलेन कुठे? नंतर अचानक बदल झाला आणि सांगितले की, आपण शिवसेनेबरोबर जायचे. मला सांगा, २०१७ रोजी शिवसेना जातीयवादी असल्याचे सांगत त्यांच्याबरोबर जायचे नाही, असे म्हटले. मग असा काय चमत्कार झाला की, दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला? ज्या भाजपाबरोबर जायचे होते तो जातीयवादी कसा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांनी आपल्याला सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आणि संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. या गोष्टीलाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडले कुणास ठाऊक? त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता, तर दिला कशाला? नोकरीला लागला की, माणूस ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो, आयएएस, आयपीएस ६० व्या वर्षी रिटायर्ड होतात. राजकारणामध्ये भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केले जाते. मग तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. चुकले तर सांगा की, अजित तुझे हे चुकले. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, राजकारणात नवीन पिढी पुढे येईल, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.