'जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 04:42 PM2023-07-02T16:42:47+5:302023-07-02T16:45:10+5:30

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे

'If we can go with Shiv Sena, we can also go with BJP', Ajit Pawar clarify about bjp and power | 'जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो'

'जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो'

googlenewsNext

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदींचं मोठं काम असून देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला. आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन सरकारमध्ये सामिल होण्याचं ठरवलं. अनेक दिवस चर्चा सुरू होती. देशपातळीवरील आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करुन विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. 

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा पक्षच भाजपने फोडला आहे. कारण, अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आम्ही नागालँडमध्ये भाजपासोबत आहोत, जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर, भाजपासोबतही जाऊ शकतो, असेही अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत, देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, म्हणूनचं त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय झाला. विकासाला महत्व देण्यासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला. मी शुक्रवारी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला. इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. आम्ही तरुणांना संधी देणार. त्यामुळे आदिती तटकरे, संजय बनसोडे या तरुणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. तसेच, महिला, आदिवासी, ओबीसींना मोठ्या प्रमाणात सत्तेत संधी आहेत. आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना असूनसुध्दा विकासाकामे केली. आपण विकासाला महत्व देऊनच काम करतो, टीका टिपण्णीला महत्व देत नाही, असेही ते म्हणाले.  

राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सत्तेत

पक्षातल्या बहुतेकांना आमचा निर्णय मान्य असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार बरोबर आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आणि पक्षाच्या चिन्हावर या पुढच्या निवडणुका लढविणार. घड्याळ या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढविणार, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, आम्ही शिवेसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप बरोबर सुध्दा जाऊ शकतो. नागालँण्डमध्ये पक्ष यापूर्वीच भाजप बरोबर आहे. पक्ष वाढीसुध्दा आम्ही सर्वस्व पणाला लावणार. काही आमदार बाहेर आहेत, संध्याकाळपर्यंत ते मुंबईत पोहोचतील. पक्षाच्या आमदारांसह कार्यकर्ते सुध्दा आमच्यासोबत आहेत, असे म्हणत अजित पवार यांनी शपथविधीनंतर स्वत:ची आणि राष्ट्रवादी पक्षाचीही भूमिका स्पष्ट केली.  

राज्याचं आणि देशाचं हित पाहूनच सत्तेत

लोकशाहीत बहुमताला महत्व, त्यामुळे बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्ष आमच्यासोबत आहे, सर्व नेते आमच्यासोबत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत आलो आहोत. राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले. त्यामुळे सहकारी पक्षांना सोबत घेऊनच राज्यातील सत्ता चालवावी लागले. राज्याचं आणि देशाचं हित बघुनच सत्तेत येण्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. 

Web Title: 'If we can go with Shiv Sena, we can also go with BJP', Ajit Pawar clarify about bjp and power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.