रेल्वेच्या डब्यांचे अतिदक्षता विभागात रूपांतर अशक्य; रेल्वे मंत्रालयाची उच्च न्यायालयाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 11:52 PM2020-07-02T23:52:36+5:302020-07-02T23:52:55+5:30
सामाजिक कार्यकर्ते नरेश कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले
मुंबई : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी रेल्वेच्या डब्यांचे अतिदक्षता विभागात (आयसीयू) रुपांतर करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने असमर्थता दर्शवली आहे.
रेल्वेच्या डब्यांचे आयसीयूमध्ये रूपांतर करण्यासाठी डब्याच्या डिझाईनमध्ये बदल करणे आवश्यक आहे आणि ते डब्यांची निर्मिती करतानाच करणे शक्य आहे, असे रेल्वे मंत्रालयाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, मध्य रेल्वेने २४ गाड्यांचे ४८२ डब्यांचे रुपांतर विलगीकरण डबे म्हणून केले आहे. नॉन एसी डब्यातील मधले आसन काढण्यात आले आहे. शौचालयाचे रूपांतर बाथरूममध्ये केले आहे. तसेच बोगीत प्रवेश केल्यानंतर पहिल्या केबिनचा वापर स्टोअर रूम किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी केला जाऊ शकतो.
मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेनेही १८ गाड्यंमधील ४१० डब्यांचे विलगीकरण डब्यात रुपांतर केले आहे. हे विलगीकरण डबे मुंबई व भावनगर (गुजरात) दरम्यान महत्त्वाच्या स्थानकांवर थांबविण्यात आले आहेत, असे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेश कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. मुंबई व एमएमआरडीएच्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे ट्रेनची सेवा सुरू होत नाही तोपर्यंत सर्व रिकाम्या डब्यांचे रूपांतर विलगीकरण डबे म्हणून करावे, असे कपूर यांनी याचिकेत म्हटले आहे.