लोकल अपघातांत २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू; पश्चिम रेल्वेची उच्च न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:50 AM2024-08-29T09:50:52+5:302024-08-29T09:54:09+5:30
मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांत २६ हजार ५७२ प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात ही धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे.
लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करीत यतीन जाधव यांनी ॲड. रोहन शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीवेळी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश रेल्वेला दिले होते. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त संतोषकुमार सिंह राठोड यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.
मध्य रेल्वेवर १५ वर्षांत २९ हजार मृत्यू-
१) मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर १५ वर्षांत २९ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशी ऋषन यांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर अपघाती बळींची संख्या अधिक आहे.
२) २००९ ते जून २०२४ दरम्यान रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून खाली पडणे, खांबाला धडकणे, प्लॅटफॉर्म व फुटबोर्डच्या जागेत सापडणे आदी अपघातांत २९,३२१ प्रवाशांचा मृत्यू झाला.
३) २००९-१० मध्ये ३,३९६, तर २०२३-२४ मध्ये २,१५९ अपघात घडले, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.