अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:12 AM2024-06-28T09:12:08+5:302024-06-28T09:17:04+5:30

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते.

in mumbai action taken against unauthorised hawkers high court scold bmc | अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम

अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम

मुंबई : अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. इतर वेळी मात्र सामान्य नागरिकांना पदपथावरून चालणे मुश्किल होते, अशा शब्दांत न्यायालयाने कान टोचल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आता पालिका आणि मुंबई पोलिस संयुक्त कारवाई करणार आहेत. फक्त दिवसाच नाही तर रात्रीच्या वेळेस तसेच शनिवार, रविवारीही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिस यांची संयुक्त बैठक पालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (मुंबई पूर्व विभाग) डॉ. महेश पाटील, उपआयुक्त अभिनव देशमुख उपस्थित होते.

पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. अतिक्रमण निर्मूलन करताना आता सातत्य ठेवावे लागणार आहे. वारंवार कारवाई करून देखील कोणी जुमानत नसेल तर त्यांचा वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडित करा. परवाना असेल तर तो रद्द करा आदी सूचनाही आयुक्त गगराणी यांनी केल्या.

१) कांदळवनांवर बांधकामांचा राडारोडा टाकून भराव केला जातो. 

२)  त्यानंतर त्यावर अनधिकृत बांधकामे केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

३)  पालिका प्रशासन आणि पोलिस यांची भरारी पथके नेमून अशा प्रकाराला आळा घालावा, असेही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.

‘परवाना निलंबित करा’-

मुंबई पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी अतिक्रमण निर्मूलन कारवाईप्रसंगी पोलिस बंदोबस्त पुरविला जाईल. फेरीवालेमाफिया यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले. पब, बार यांनी अनधिकृतपणे केलेली बांधकामे पाडण्याची कार्यवाही पालिकेने करावी. या आस्थापनांचा, खाद्य परवाना निलंबित करावा, अशीदेखील सूचना चौधरी यांनी केली.

Web Title: in mumbai action taken against unauthorised hawkers high court scold bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.