बोरिवली-विरार अतिरिक्त मार्गिकेचा मार्ग मोकळा; खारफुटीची झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:30 AM2024-09-07T11:30:45+5:302024-09-07T11:33:40+5:30
बोरिवली ते विरारदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :बोरिवली ते विरारदरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. या पट्ट्यात असलेली २,६१२ खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने एमआरव्हीसीला गुरुवारी दिली. हा व्यापक जनहिताचा प्रकल्प आहे आणि या दोन मार्गिकांमुळे इंधन वाचेल आणि वाहतूककोंडी कमी होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा असून, त्याचे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय फायदे आहेत, असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ३० ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली.
वाहतूककोंडी होणार कमी -
रेल्वेचा प्रवास हा पर्यावरणपूरक प्रवास आहे आणि जगातील सर्वांत कार्यक्षम वाहतूक पद्धत आहे. बोरिवली ते विरारमधील पाचव्या व सहाव्या मार्गिकेमुळे उत्सर्जन कमी होईल, वाहतूककोंडी कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल, असे न्यायालयाने म्हटले.
‘७,८२३ खारफुटी लावा’-
‘संपूर्ण प्रकल्प महत्त्वाचा आहे. अस्तित्वात असलेल्या मार्गिकांच्या लगतच नव्या मार्गिका जोडण्यात येणार आहेत,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने रेल्वेला २,६१२ खारफुटीची झाडे तोडल्यावर त्याच्या मोबदल्यात ७,८२३ खारफुटीची झाडे लावण्याचे आदेश दिले.
परवानगी घेणे बंधनकारक-
१) अतिरिक्त मार्गिकेची मागणी लोकांकडूनच होत असल्याने पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या मार्गात येत असलेल्या २,६१२ खारफुटींची झाडे तोडण्याची परवानगी मागण्यासाठी पश्चिम रेल्वेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
२) या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. न्यायालयाने दिलेल्या एका जुन्या आदेशानुसार, खारफुटी तोडण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.