मुंबईत काँग्रेस शिवसेनेच्या तीन जागांवर दावा सांगणार; शिवसेना सोडलेल्या नेत्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 06:10 PM2023-10-04T18:10:53+5:302023-10-04T18:11:30+5:30
ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागांवर लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक जागा सोडण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.
येत्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपा, काँग्रेस या मोठ्या पक्षांसह सर्वच प्रादेशिक पक्षांनी तयारी सुरु केली आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या पारड्यात कशा पाडून घेता येतील याकडे या सर्वांचे लक्ष आहे. भाजपासोबत असलेल्यांना भाजपा सांगेल ती आणि देईल ती जागा लढावी लागणार आहे. परंतू, विरोधकांच्या इंडिया आघाडीत मोठी फाटाफूट होण्याचे संकेत मिळत आहेत.
इंडिया आघाडीमध्ये आता जागावाटपांवरून वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस राज्या राज्यांत प्रबळ असलेल्या प्रादेशिक पक्षांच्या तोंडचा घास हिरावण्याची शक्यता आहे. इकडे महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होणार आहे. यात शिवसेनेचा गड असलेली मुंबईतील सहापैकी तीन जागांवर काँग्रेस दावा करणार असल्याचे संकेत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिले आहेत.
ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागांवर लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक जागा सोडण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. परंतू, काँग्रेसने ठाकरे गटाला खिंडीत गाठण्याचा प्रकार सुरु केला असून तीन जागांवर दावा केला आहे.
उत्तर पश्चिम , दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वत: उमेदवार म्हणून दावेदार असल्याचेही निरुपम यांनी म्हटले आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 पर्यंत मुंबईत लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यात काँग्रेस सहा पैकी पाच लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढवत होते. यामुळे एका जागेवर समाधान मानण्यास आम्ही तयार नसल्याचे निरुपम म्हणाले.