मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:51 AM2024-09-05T11:51:00+5:302024-09-05T11:52:53+5:30

गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण, तसेच मोदकासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

in mumbai ganesh festival 2024 demand for coconuts for modak pooja and torana increased arrivals from tamil nadu and kerala | मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

मोदक, पूजा, तोरणासाठी श्रीफळाला मागणी; तामिळनाडू, केरळहून वाढली आवक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :गणेशोत्सवानिमित्त पूजा, तोरण, तसेच मोदकासाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई परिसरात उत्सव कालावधीत २५ ते ३० लाख नारळांची विक्री होते. यंदा गणेशोत्सवासाठी किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक विक्रेत्यांकडे नारळाची २० ते २५ टक्के मागणी नोंदवली आहे.  

किरकोळ बाजारात सध्या एका नारळाची किंमत दर्जानुसार २० ते ४० रुपयांदरम्यान आहे. तामिळनाडू, केरळ येथून बाजारात आठवड्याला चार ते पाच हजार पोती नारळांची आवक होत आहे. 

मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १२ हजार आहे, तसेच बहुतांश घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. मोदकांची विक्री करणारे गृहद्योग, पोळी-भाजी केंद्र आदींकडून मागील आठ दिवसांपासूनच नारळाची खरेदी सुरू केली आहे, अशी माहिती लालबाग येथील नारळ व्यापारी अंकुश काळे यांनी  दिली.

तीन ते पाच रुपयांची किरकोळ बाजारात वाढ-

१) मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात शेकड्याच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे, तर किरकोळ बाजारात नारळाच्या दरात तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे.

२) सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी या जातीच्या नारळांना मागणी असते. मागणीत झालेल्या वाढीमुळे व्यावसायिक आणि विक्रेत्यांना दोन पैसे अधिक मिळत असल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: in mumbai ganesh festival 2024 demand for coconuts for modak pooja and torana increased arrivals from tamil nadu and kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.