पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:05 AM2024-09-10T10:05:53+5:302024-09-10T10:16:04+5:30

पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत.

in mumbai the problem of rain water logging in the western suburbs will soon be resolved high court lifts stay on mogra udanchan centre | पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली

पश्चिम उपनगराची पाणी तुंबईतून लवकर सुटका; मोगरा उदंचन केंद्रावरील स्थगिती न्यायालयाने उठवली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. अंधेरी येथील उदंचन केंद्र उभारणीसाठी   जागेचा वाद  मुंबईउच्च न्यायालयात गेला होता. त्यामुळे न्यायालयाने मोगरा उदंचन केंद्र उभारण्यास स्थगिती दिली होती. मात्र आता ही स्थगिती उठवण्यात आल्यामुळे केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरते. त्यावेळी फ्लड गेट्स बंद करावे लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. साहजिकच पंप लावून पाणी खेचावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड आणि चितळे  समितीच्या अहवालात शिफारशी केल्या होत्या. २६ जुलै २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या जलप्रलयात  मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली होती. त्यानंतर अशी परिस्थिती का उद्भवली, मोठ्या प्रमाणावर पाणी का तुंबले, भविष्यात अशी समस्या उद्भवू नये, यासाठी डॉ. माधवराव चितळे समितीने दिलेल्या अहवालात शिफारशी केल्या होत्या. 

 जागेअभावी रखडले होते काम -

अहवालात आठ ठिकाणी उदंचन  केंद्रे उभारण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पालिकेने हाजीअली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबांध येथे केंद्रे उभारली. मात्र अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील आणि माहुल येथील केंद्राचे काम जागेअभावी रखडले आहे.

केंद्र उभारण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या होत्या. जमीन उपलब्ध होऊ न शकल्यामुळे निविदा रद्द कराव्या लागल्या होत्या. मोगरा येथील केंद्र नाल्याच्या प्रवाहात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र नाल्याच्या जमिनीच्या मालकीवर खासगी व्यक्तींनी हक्क सांगितला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि  कामाला स्थगिती दिली होती.

३३ कोटी जमा करण्याचे आदेश -

काही काळानंतर तोडगा म्हणून ३३ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देत उदंचन केंद्राच्या कामाला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यामुळे उदंचन  केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बांधकामासाठी आवश्यक त्या परवानग्या संबंधित विभागांकडून प्राप्त  झाल्यानंतर वर्षाच्या  अखेरीस  केंद्र उभारण्याच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: in mumbai the problem of rain water logging in the western suburbs will soon be resolved high court lifts stay on mogra udanchan centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.