शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘वर्षा’वर एक तास खलबते; निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 06:15 AM2024-07-27T06:15:05+5:302024-07-27T06:15:24+5:30
चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता, असे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग येणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक तास चर्चा केली.
चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा बराच घोळ महायुतीमध्ये झाला होता, तसा विधानसभेला होऊ नये यासाठी लगेच जागावाटपाची चर्चा सुरू करावी, असे ठरल्याचे समजते. तिन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू करायला कोण-कोण नेते असतील, याची नावेही या बैठकीत निश्चित करण्यात आली, असेही सूत्रांनी सांगितले.
जागावाटपाचे सूत्र लवकर निश्चित झाले नाही, तर आपल्या आमदारांची किंवा तगड्या उमेदवारांची पळवापळवी होऊ शकते, अशी शंका महायुतीला आहे. महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीकडून लढू शकतात. महायुतीचे जागावाटप लवकर ठरले तर त्यांना शब्द देणे सोपे जाईल, असाही विचार पुढे आला आहे.
...म्हणून अजित पवारांना काळजी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागावाटप लवकरात लवकर करावे यासाठी सर्वाधिक आग्रही असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या आमदारांवर शरद पवार गटाकडून जाळे टाकणे सुरू झाले आहे. आपला एकही आमदार फुटू नये यासाठी अजित पवार सतर्क झाले आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात - शिरसाट
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होईल, असा दावा शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गुरुवारी रात्री जी चर्चा झाली त्यात मंत्रीमंडळ विस्ताराचाही विषय असू शकतो, असा दावा शिरसाट यांनी केला. मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्याचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल, असेही ते म्हणाले.