मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या; विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:23 PM2024-07-03T14:23:06+5:302024-07-03T18:57:41+5:30
Mumbai News : मुंबईतल्या पाणीकपातीचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आता या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलवली आहे.
Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात दोन महिन्यांपूर्वी पाणीकपात जाहीर केली होती. संपूर्ण मुंबईत ३० मेपासून ५ टक्के तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही ही कपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. विधानसभेत आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी मांडल्या. "मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या उबाठा गटाने मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र दोन तास ही पाणी मिळत नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात २४ तास पाणी पुरवठ्याचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे आता एक तासभरसुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे. तसेच मुंबईच्या सगळ्याच भागात याबाबत तक्रारी आहेत," असे आशिष शेलार यांनी म्हटलं.
आमदार आशिष शेलार यांनी मुंबईकरांच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर त्याला मुंबईतील अन्य आमदारांनी पाठींबा दिला. त्यामुळे याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणी पुरवठ्याची माहिती संबधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबत शुक्रवारी आमदार, महापालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची बैठक विधानभवनात आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.