इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:50 AM2019-12-22T05:50:07+5:302019-12-22T05:50:15+5:30
शीना बोरा हत्याकांड
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. विशेष न्यायालयाने चौथ्यांदा तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. अटक केल्यापासून आतापर्यंत तिने चार वेळा जामीन अर्ज केला. मात्र, न्यायालयाने चारही वेळेस तिचा जामीन अर्ज फेटाळला. हा जामीन अर्ज करण्यापूर्वी तिने नोव्हेंबर २०१८ मध्ये तब्येतीचे कारण देऊन न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. त्या वेळीही न्यायालयाने तिची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला.
या वेळीही तिने प्रकृतीचे कारण दिले. आपली तब्येत खालावत असून उपचारासाठी जामिनावर सुटका करा अशी विनंती तिने न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने २०१८ पासून आतापर्यंत परिस्थितीत कोणतेही बदल नाहीत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. इंद्राणीची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. तिची तब्येत सुधारू शकत नाही. त्यामुळे तिची तब्येत ढासळतच जाणार, असे डॉक्टरांचे मत आहे, असे इंद्राणीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगत तिला जामीन देण्याची विनंती केली.
त्यावर सीबीआयच्या वकिलांनी आक्षेप घेत म्हटले की, २०१८ पासून आतापर्यंत तिच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. तिची तब्येत खालावल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.
न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांचे म्हणणे मान्य करत इंद्राणीचा जामीन अर्ज फेटाळला.
शीना (२४) हिची हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने केली. संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. शीनाच्या हत्येप्रकरणी इंद्राणी व इंद्राणीचा पहिला पती संजीव खन्ना, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली. श्यामवर राय हा नंतर माफीचा साक्षीदार झाला.
पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल व शीनाचे प्रेमसंबंध होते आणि हे संबंध इंद्राणीला मान्य नव्हते. तसेच संपत्तीमध्ये ती वाटा मागेल, या भीतीने इंद्राणीने एप्रिल २०१२ मध्ये हत्या केली.