कोकण रेल्वेतील तिकीट आरक्षणाची चौकशी करा; अजित पवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 06:35 AM2023-05-25T06:35:40+5:302023-05-25T06:36:00+5:30
मुंबईच्या छत्रपती टर्मिनस वरुन १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजार पार गेल्याची बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल होत आहे. याला रेल्वे अधिकारी आणि तिकीट दलाल यांच्यातील अभद्र युती असून तिकिटांचे आरक्षण करून चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईच्या छत्रपती टर्मिनस वरुन १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजार पार गेल्याची बाब समोर आली आहे. तर १६ सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर ‘रिग्रेट’ हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव असून हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे अजित पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.