मातोश्री-२ खरेदीची चौकशी करा, काँग्रेस नेते संजय निरूपम यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:43 AM2020-07-10T02:43:51+5:302020-07-10T02:44:26+5:30
पडेल दरात मोक्याची जागा घेतल्याचा दावा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळच उभारण्यात येत असलेल्या नव्या मातोश्री-२च्या खरेदीत अनियमितता असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा बाजारभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आली असल्याने या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी निरूपम यांनी केली आहे.
गुजरात येथील स्टर्लिंग बायोटेक या कंपनीचे संचालक राजभूषण दीक्षित यांच्यासह अन्य लोकांची सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. हाच धागा पकडत काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीतील प्रकरणांचा तपास संपला असेल तर ईडीने मुंबईतही लक्ष घालावे.
राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मातोश्री-२साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले. बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे.
ठाकरे कुटुंबीयांनी राजभूषण दीक्षित आणि त्याच्या भावाकडून मातोश्री-२साठी जमीन विकत घेतली. हे दीक्षित बंधू १४ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत होते.
त्यांच्यावर गुन्हाही दाखल असल्याचे निरूपम म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलाजवळच्या मोक्याच्या ठिकाणी दहा हजार चौरस फुटांच्या जागेतील मातोश्री-२साठी ठाकरे कुटुंबीयांनी दीक्षित बांधवांना केवळ ५.८ कोटी रुपये दिले.
बाजारभाव पाहता ही रक्कम अगदी किरकोळ आहे. या व्यवहारात चेकने पैसे देतानाच मोठ्या प्रमाणावर रोखीनेही पैसे दिले गेले असण्याची शक्यता आहे. दीक्षित बांधवांनी इथेही काळा पैसा फिरवला असण्याची शक्यता असून या सर्व प्रकरणाचा तपास व्हायला हवा, असे निरूपम यांनी म्हटले आहे.
निरूपम यांचा बोलविता धनी वेगळा- शिवसेना
संजय निरूपम यांना सध्या काँग्रेसमध्येच कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांची दखल घेण्याची आवश्यकता नाही. असे आरोप करण्यापूर्वी त्यांनी दिल्लीतील आपल्या नेत्यांची परवानगी घेतली होती का, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचीच चौकशी करण्याची मागणी निरूपम कशी काय करतात? निरूपम यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे.
भाजपचे खासदार नितेश राणे यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, संदेसरा घोटाळ्यात ईडीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील आरोपी राजभूषण दिक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीमधील भागीदारी जोरदार दिसते. काँग्रेस-शिवसेना दोस्ती बहुत पुरानी लगती है.