'चीन-पाकिस्तानच्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी खोटा इतिहास सांगून दिशाभूल करतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 08:53 PM2021-10-13T20:53:13+5:302021-10-13T20:59:19+5:30
राजनाथसिंह हे संरक्षणमंत्री आहेत, देशाच्या सीमेवर चीन-पाकिस्तानकडून सुरु असलेल्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना खोटा इतिहास सांगून ते दिशाभूल करत आहेत.
मुंबई - देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी विनायक दामोदर सावकर (Vinayak Damodar Savarkar) आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या संबंधावर मोठं वक्तव्यं केलं आहे. 'अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती', असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. सिंह यांच्या या विधानानंतर देशभरातून गांधीवादी विचारक आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सिंह यांना सत्य जाणून घेण्याचं सूचवलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजनाथसिंह यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.
राजनाथसिंह हे संरक्षणमंत्री आहेत, देशाच्या सीमेवर चीन-पाकिस्तानकडून सुरु असलेल्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना खोटा इतिहास सांगून ते दिशाभूल करत आहेत. सावरकरांच्या माफीनाम्याचे खापर महात्मा गांधींवर फोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न ते करत आहे, असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही खरा इतिहास जाणून घेण्याचं सूचवलं आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राजनाथ सिंह यांच्या या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करुन सावरकर आणि गांधी या वादात उडी घेतली आहे. ''आपल्या माहितीसाठी सांगतो, सावरकरांनी पहिली माफी १९११ साली मागितली. तेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. माफी मागितल्यावर तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९१५ साली गांधीजी भारतात परत आले,'' असा इतिहास आव्हाड यांनी सांगितला आहे.
महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका :राजनाथ सिंह
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2021
आपल्या माहितीसाठी सांगतो
सावरकरांनी पहिली माफी १९११ साली मागितली तेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते.
माफी मागितल्यावर तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९१५ साली गांधीजी भारतात परत आले.#खोटबोलरेटूनबोल
काय म्हणाले ओवैसी
असदुद्दीन ओवैसी यांनी "हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असंच चालू राहिलं तर ते महात्मा गांधी यांना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील" अशी जोरदार टीका केली आहे.
सावरकरांचे योगदान नाकारता येत नाही
राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. यावेळी राजनात सिंह म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या विचारसरणीवरुन त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही.'