राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का? मिटकरींची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:41 AM2023-01-04T10:41:35+5:302023-01-04T10:52:05+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का? असा खोचक सवाल मिटकरींनी विचारला आहे
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गट यावरून आक्रमक झाला आहे. अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजप समर्थक रस्त्यावर उतरुन अजित पवार यांच्या विधानाचा निषेध नोंदवत आहेत. त्यावर, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे खंदे समर्थक अमोल मिटकरी हेही मैदानात उतरले आहेत. मिटकरींनी अजित पवारांची बाजू सांभाळताना भाजपला राज्यपालांची आठवण करुन दिली. मात्र, यावेळी, त्यांनी राज्यपालांचा एकेरी उल्लेख केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का? असा खोचक सवाल मिटकरींनी विचारला आहे. तसेच देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी औरंगजेबाचे वारसदार बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. “देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी औरंगजेबाचे वारसदार बसले आहेत. कारण जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यावेळी भाजपाचा एकही व्यक्ती रस्त्यावर आंदोलन करताना दिसला नाही.”, असे मिटकरींनी म्हटले.
“आज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते… असं जेव्हा अजित पवार बोलले, तेव्हा एका सुरात भारतीय जनता पार्टीची लोक पेटायला लागली. अरे इतकं पेटायचं काय कारण आहे? तो भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई लागतो का?” असा राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत मिटकरींनी भाजपला लक्ष्य केलं. “जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांनी महापुरुषांचा अवमान केला, त्याविरोधात एकही ‘माई का लाल’ पुढे आला नाही. आता सगळेजण एका माणसाविरुद्ध आंदोलन करत आहेत,” अशी टीकाही मिटकरींनी केली.
भाजप आमदारांना दिलं होतं चॅलेंज
अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, संभाजी महाराजांनी केवळ हिंदू आणि हिंदू धर्मासाठीच बलिदान केलं असं जर कोणी म्हणत असेल, नवीन जावई शोध लावत असेल तर, भाजपच्या कोणत्याही आमदाराने माझं चॅलेंज स्विकारावं. संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते की धर्मवीर यासाठी डिबेटमध्ये बसावं. जो कोणी हरेल त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असं चॅलेंजच आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदारांना यापूर्वी दिलं आहे.