उपवास करणाऱ्यांना जेवण पार्सल देण्याची जैन मंदिरांना परवानगी - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 02:13 AM2021-04-17T02:13:18+5:302021-04-17T02:13:42+5:30
High Court : उपवास १९ ते २७ एप्रिलदरम्यान असतील. जैन समुदायातील बांधवांना उपवासावेळी सेवन केल्या जाणाऱ्या जेवणाचा डबा ट्रस्ट परिसरातून घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका जैन ट्रस्टद्वारे दाखल करण्यात आली होती.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील ५८ आणि पुण्यासह नाशिक येथील ३ जैन मंदिरांना वर्षातील नऊ दिवसांच्या उपवासासाठीच्या आयंबिल ओळी तपदरम्यान सेवन केले जाणारे विशेष अन्न लोकांच्या घरी पार्सल देण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी कोणत्याच परिस्थितीत कोणत्याही भाविकांना उपवासादरम्यान मंदिरात जाता येणार नाही, असे न्यायाधीश एस.सी. गुप्ते आणि न्यायाधीश अभय अहुजा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
उपवास १९ ते २७ एप्रिलदरम्यान असतील. जैन समुदायातील बांधवांना उपवासावेळी सेवन केल्या जाणाऱ्या जेवणाचा डबा ट्रस्ट परिसरातून घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका जैन ट्रस्टद्वारे दाखल करण्यात आली होती.
याचिकेवरील सुनावणीदरम्यान ट्रस्टचे अधिवक्ता प्रफुल्ल शाह यांनी फक्त त्यांच्या जेवणाचा डबा येथून घेऊन जावा, एवढेच आमचे म्हणणे असल्याचे सांगितले. उपवासाचे जेवण स्वयंसेवकांच्या मदतीने भाविकांच्या घरी पोहोचविण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.